शबनम न्यूज | प्रतिनिधी
रस्त्यातून गाडी हटवण्यावरून झालेल्या वादात एका रिक्षाचालकाला दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. ५) दुपारी ४ वाजता खेड तालुक्यातील निघोजे गावात घडली.
प्रतीक औटी (वय २७, रा. मूळगाव करमाळा, सध्या रा. निघोजे, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. रोहित गोकुळ कोळपकर (वय २३, रा. निघोजे) असे मारहाणीत जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. ८) याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास फिर्यादी रोहित कोळपकर हे रिक्षाने जात असताना आरोपी औटी याच्या इग्निस कार (एमएच १२ यूएस २०२५) बाजूला घेण्यास सांगून रस्ता मोकळा करण्यास सांगितले होते. यावरून आरोपी संतापला आणि गाडीतून उतरून काळ्या पोपटी दांड्याने फिर्यादीच्या डोक्यात प्रहार केला. या मारहाणीमुळे फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर पाच टाके, नाकाजवळ जखम होऊन फॅक्चर झाले. तसेच मेंदूला सूज आल्याचे अहवालात नमूद आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.



