मराठी भाषा संवर्धनासाठी अभिजात मराठी भाषा सप्ताह उपयुक्त – आयुक्त शेखर सिंह
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित अभिजात मराठी भाषा दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे दिमाखात उद्घाटन
पिंपरी, दि. ३ ऑक्टोबर २०२५ : संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पदस्पर्श तसेच विचारांचा वारसा पिंपरी चिंचवड शहराला लाभला आहे. मराठी भाषेला समृद्ध करण्यामध्ये संतसाहित्यातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. अशा या समृद्ध मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा प्रत्येकालाच गर्व आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने नेहमीच मराठी भाषेच्या संवर्धन, प्रचार आणि प्रसारासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. महापालिकेने आयोजित केलेला अभिजात मराठी भाषा सप्ताह हा मराठी भाषा संवर्धनासाठी उपयुक्त ठरेल. तसेच या माध्यमातून चांगले कलाकार तर घडतीलच, शिवाय चांगले रसिक देखील घडण्यास मदत होईल, ’ असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा व महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने आणि महानगरपालिकेचे श्री. भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय भोसरी व हुतात्मा चाफेकर सार्वजनिक ग्रंथालय चिंचवड यांच्या सहभागातून ३ ऑक्टोबर २०२५ रोजी “अभिजात मराठी भाषा दिवस” तसेच ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “अभिजात मराठी भाषा सप्ताह” आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचे उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार अमित गोरखे, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष राजन लाखे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे मराठी भाषा संवर्धन, प्रचार व प्रसारासाठी प्रबोधन पर्व, विचार पर्व, व्याख्यानमाला, शाळकरी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन वेळोवेळी केले जात आहे. अभिजात मराठी भाषा दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने देखील साहित्यिक चर्चा, गझल, अभंग, भजन, कवी संमेलन, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथप्रदर्शने, मराठी चित्रपट कलाकारांशी हितगुज, शाहीरी पोवाडे, एकांकिका, मराठी वेशभूषा, लोककला कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी महापालिकेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. विद्यार्थी दशेतच त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन दिल्याने त्याचा फायदा त्यांना भविष्यात देखील होतो, असेही ते म्हणाले.
पिंपरी चिंचवड महापालिकेने इतिहास घडवला!
‘अभिजात मराठी भाषा दिवस आणि सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेने भव्य असा कार्यक्रम घेऊन एकप्रकारे इतिहास घडवला आहे,’ असे गौरवोद्गार आमदार अमित गोरखे यांनी यावेळी काढले. ते म्हणाले, महाराष्ट्रात कोणत्याही शहरात अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त असा भव्य कार्यक्रम एखादी महापालिका घेताना दिसत नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिग्गज मंडळी पिंपरी चिंचवड शहरात येत आहेत. पिंपरी चिंचवड शहराला मानाचा तुरा देण्याचे काम यानिमित्ताने महापालिकेने केले आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी महापालिका वेगवेगळे प्रयत्न करीत आहे. मराठी शाळा चांगल्या पद्धतीने ही महापालिका चालवते. आता अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये महापालिका शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनाही सहभागी करून घ्यावे, असेही ते म्हणाले. वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. अशा परिस्थितीत वाचनाला प्रत्येकाने प्राधान्य देणे गरजेचे आहे. जीवनात यश मिळवण्यासाठी वाचन खूप महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
अॅड. गोरक्ष लोखंडे यांनी सांगितले की, मराठी भाषेला जिवंत ठेवण्याचे काम संतसाहित्यातून झाले आहे. मराठी कलाकारांचे देखील या भाषेला समृद्ध करण्यामध्ये योगदान आहे. पिंपरी चिंचवड महापालिका विकासाला प्राधान्य देतानाच या शहरातील नागरिकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते, ही अभिमानाची गोष्ट आहे. या शहराचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम यानिमित्ताने केले जात आहे. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी भाऊसाहेब भोईर व राजन लाखे यांनीही मनोगत व्यक्त करताना महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी या सप्ताहाचा उद्देश केवळ मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करणे एवढाच नाही, तर तिचा सन्मान, गौरव आणि भविष्य पुढील पिढीकडे पोहोचवणे हा आहे, असे सांगितले. तसेच त्यांनी सप्ताहामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर माहितीही दिली. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले तर मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी आभार मानले.
…….
दिनांक ४ ऑक्टोबर रोजी होणारे कार्यक्रम
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे होणारे कार्यक्रम
- सकाळी ९ वाजता – एकांकिका सादरीकरण
- दुपारी १२ वाजता – विच्छा माझी पुरी करा (वसंत सबनीस लिखित… राजेश शिंदे दिग्दर्शित… विनोदी मराठी नाटक)
- सायंकाळी ५ वाजता – प्राणी आणि गाणी (प्रदीप निफाडकर प्रस्तुत… मराठी गीतांचा कार्यक्रम…)
- रात्री ९ वाजता – फोक प्रबोधन (प्रमोद रणनवरे प्रस्तुत… लोककलेवर आधारित परंपरेचा वारसा उलगडणारा सांस्कृतिक कार्यक्रम)
नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव
- सकाळी ९ वाजता – राजा सिंह (मराठी बालनाट्य – खास महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी)
- सायंकाळी ५ वाजता – महाराष्ट्राची लोकधारा..
महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम सर्वासाठी खुले असून ते विनामूल्य आहेत,या कार्यक्रमास शहरवासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे.