spot_img
spot_img
spot_img

पीसीसीओईआर मध्ये “यशवंती निसर्ग क्लब” स्थापना व वृक्षारोपण कार्यक्रम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

निसर्गाकडून मानवाला मिळालेल्या साधन संपत्तीचे रक्षण व संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी पीसीईटी च्या वतीने राबविण्यात येणारे पर्यावरण पूरक उपक्रम कौतुकास्पद आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे तापमानात वाढ होत आहे. कार्बन उत्सर्जन वाढल्याने नैसर्गिक संकटे वाढत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवित हानी होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशी झाडांचे वृक्षारोपण आणि संवर्धन आवश्यक आहे. ती जबाबदारी पीसीसीओईआर सारख्या इतर संस्था, संघटना, उद्योग यांनी घ्यावी असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय (पीसीसीओईआर) येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील तृतीय व अंतिम वर्षातील सुमारे १०० विद्यार्थी व अध्यापकांनी महाविद्यालयाचा “यशवंती निसर्ग क्लब” स्थापना केली. त्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले पाटील यांच्या हस्ते उद्घाटन केले. यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना बारबोले पाटील बोलत होते.
यावेळी वनाधिकारी विशाल यादव, पीसीसीओईआर चे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, विभागप्रमुख डॉ. समीर सावरकर, समन्वयक प्रा. आनंद कुडोळी, प्रा. चेतन चव्हाण, प्रा. अनिल काटे आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले की, अशा उपक्रमातून समाजामध्ये निसर्गाविषयी, वन्यजीव संपदा, वन्यप्राणी व वृक्षवल्ली संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण होईल या उद्देशाने “यशवंती निसर्ग क्लब” ची स्थापना केली आहे.

यावेळी संजीवन वनक्षेत्र परिसरात जांभुळ, चिंच, बदाम तसेच तत्सम देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
विभागप्रमुख डॉ. समीर सावरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, यंत्र आणि तंत्रज्ञान प्रगती ही आवश्यकच आहे, परंतु आपण निसर्गाचाच भाग आहोत हे माणूस जणू विसरून गेला आहे. निसर्ग तर आपलं अस्तित्व आहे. म्हणूनच पुढील पिढ्यांमध्ये निसर्गप्रेमी घडावे या उद्देशाने यशवंती निसर्ग क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण, जंगलसफारी, निसर्गतज्ञांसोबत संवाद, जनजागृती असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी “यशवंती निसर्ग क्लब” च्या स्थापनेबद्दल आणि निसर्ग संवर्धनासाठी आयोजित या उपक्रमाबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!