spot_img
spot_img
spot_img

देशाला एकसंध ठेवण्यात संविधानाचे योगदान मोलाचे शरद पवार यांचे प्रतिपादन

बालगंधर्व रंगमंदिर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरच्या लोगोचे अनावरण करताना शरद पवार. प्रसंगी डावीकडून प्रकाश म्हस्के, ऍड. भगवान साळुंखे, प्रशांत जगताप, लक्ष्मण माने, ऍड. जयदेव गायकवाड, पवार, बाबा आढाव, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. सुहास पळशीकर, डॉ. शारदा वाडेकर व अरुण खोरे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचे उद्घाटन
पुणे: “भारताच्या शेजारील पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश या देशांमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. अशावेळी भारत मात्र एकसंध व प्रगतीच्या पथावर आहे. देशाला एकसंध ठेवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान व त्यातील लोकशाही मूल्ये महत्वाचे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचे काम आपण सर्वांनी एकत्रितपणे करायला हवे, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.
माजी आमदार ऍड. जयदेव गायकवाड यांच्या पुढाकारातून स्थापित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव हे होते. प्रसंगी खासदार निलेश लंके, माजी आमदार ज्येष्ठ नेते उल्हास पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, राजकीय अभ्यासक प्रा. डॉ. सुहास पळशीकर, महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस अ‍ॅड. शारदा वाडेकर, आमदार बापूसाहेब पाठारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, संयोजक ॲड. जयदेव गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, माजी आमदार लक्ष्मण माने, प्रा. डॉ. प्रकाश पवार, डॉ. नितीश नवसागरे, विजय जाधव आदी उपस्थित होते. यावेळी ‘भारतीय संविधान: संसदीय लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर झालेल्या परिसंवादात मान्यवरांनी विचार मांडले. 
शरद पवार म्हणाले, “सामाजिक चळवळीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. २४ ऑक्टोबरला सत्यशोधक समाजाची स्थापना आणि पुणे करार झाला होता. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सामाजिक संशोधन केंद्राचे उद्घाटन होतेय, ही सकारात्मक गोष्ट आहे. बाबासाहेबांनी दाखवल्या दिशेने वाटचाल करण्याचे काम, त्यांच्या मूल्यांचा विचारविनिमय करता येणार आहे. देशात काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत, पण तरीही संविधानाचा पाया भक्कम असल्याने संसदीय साधनांचा आधार घेऊन भूमिका मांडण्याचा अधिकार आपल्याला आहे. याच संविधानामुळे भारत एकसंध आहे.”
“देशापुढील आव्हाने हळूहळू गंभीर होत आहे. अनेक विचारांचे, भूमिकांचे लोक संसदेत आहेत. कधीकधी चिंता वाटावी, असे चित्र दिसते. निर्णय घेण्याचे व्यासपीठ बाजूला ठेवून निर्णय घेतले जातात. परंतु, संविधानाच्या चौकटीबाहेर जाता येत नसल्याने अनेकदा त्यांचा भ्रमनिरास होतो. देशातील प्रत्येक समस्येवर संविधानात उत्तर आहे. त्यामुळे संविधानाचा व्यापक अर्थ, महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्थात्मक काम उभारणे गरजेचे असून, आज स्थापन झालेल्या केंद्रामुळे हे काम होईल. समतेचा पुरस्कार करणारे लिखाण व्हावे, या विचारांचा प्रसार व्हावा, संविधानाच्या विचारांवर चालणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांना प्रोत्साहित करावे आणि बाबासाहेबांचे विचार, संविधानाची मूल्ये जनमानसात पोहोचवण्याचे काम करावे,” असे आवाहन शरद पवार यांनी केले.
बाबा आढाव म्हणाले, “भारतीय संविधान हा आपल्या देशाचा पाया आहे आणि संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी नागरिकांनी संविधानाचे तत्व समजून घेणे आवश्यक आहे. आपण फक्त नियमांचे पालन करणारे नागरिक नसून, त्याचे मूल्य जाणणारे, जबाबदार नागरिक असणे महत्त्वाचे आहे. वर्तमान काळात वाढत असलेल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी लोकशाहीला केवळ कायद्याचे पालन पुरेसे नाही; त्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रियपणे विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्याची भूमिका पार पाडणे गरजेचे आहे. कृतिशील कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे.
डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले, “हा देश एकात्म, एकसंध ठेवायचा असेल, लोकशाही टिकवायची असेल, तर आपल्याला एकत्रितपणे अन्यायाच्या, चुकीच्या गोष्टी व लोकांच्या विरोधात लढायला हवे. लोकशाही फक्त निवडणुका घेण्यात नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांचे रक्षण करण्यात आहे. जात, धर्म, भाषा किंवा प्रांत यांसारख्या भिंती पाडून परस्परांचा सन्मान करणे ही खरी देशभक्ती आहे. विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. सत्तेच्या किंवा समाजातील चुकीच्या गोष्टींविरोधात आपण आवाज उठवतो, तेव्हाच लोकशाही मजबूत होते.”
डॉ. सुहास पळशीकर म्हणाले, “संविधानिक नैतिकता जपण्याची आज गरज आहे. स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. कायदे करून बंधुभाव लादता येत नाही. राष्ट्राची एकात्मता टिकून राहण्यासाठी बंधुभावाचा अंगीकार करायला हवा. राष्ट्राचा आत्मा असलेल्या नागरिकांना या तीनही तत्वांची जाणीव करून देण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आपली लोकशाही जगात सर्वात मोठी आहे, असे मानून आपण आत्मसंतुष्ट होतो. आजच्या भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.”
अ‍ॅड. शारदा वाडेकर म्हणाल्या, “माहात्मा फुले यांनी विविध धर्मग्रंथ, पुराणांचा अभ्यास करून सत्यशोधक समाजाला मार्ग दाखवण्यासाठी सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ लिहिला. निर्मिक हा निर्गुण व निराकार आहे. मूर्ती येते तिथे मध्यस्थ येतो. सत्यशोधक समाजाची निर्मिती करताना फुले यांनी मध्यस्थाला दूर ठेवण्यासाठी, भटशाहीकडून नाडल्या जाणाऱ्या समाजाला दिलासा देण्यासाठी त्यांनी काम केले. फुले ब्राह्मणद्वेषी नव्हते, तर ब्राह्मण्यवादाला विरोध होता.”
प्रास्ताविकात अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी सांगितले की, संविधानाची नैतिकता अधोरेखित करण्याचा आमच्या सामाजिक अभ्यास केंद्राचा प्रयत्न राहणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आणि बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले ते कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थांशी समन्वय साधून अभ्यास प्रकल्पासंदर्भात चर्चा, संवाद करणे, यावर भर दिला जाणार आहे. डॉ. आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. प्रास्ताविक केले. अरुण खोरे यांनी स्वागतपर भाषण केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. विजय जाधव यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!