spot_img
spot_img
spot_img

प्रत्येक शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शाळा अनुदानित असो वा विनाअनुदानित, सरकारी असो वा खासगी तेथे मराठी विषय शिकवलाच गेला पाहिजे. प्रत्येक शाळेत मराठी भाषा बंधनकारक आहे. प्रत्येक शाळेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शाळा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ आदींसह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये (सीबीएसई) राज्यभाषा मराठी शिकविणे अनिवार्य आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकविणे देखील बंधनकारक आहे. सर्व शिक्षकांनी याकडे लक्ष द्यावे. तसेच प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे म्हटले गेले पाहिजे. यासोबतच मराठी भाषा, अभिजात भाषा दर्जाबाबतही प्रत्येक शाळेत विविध उपक्रम राबविण्यात यावेत. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच वृक्षारोपणाचे महत्त्व कळावे यासाठी शाळांमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम सुरू करण्यात यावा. यासाठी प्रत्येक झाडाला क्यूआर कोड देऊन, झाडांचा वाढदिवस देखील साजरा करावा. अधिकाऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाला एका झाडाच्या संगोपनाची जाबाबदारी देण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थी त्या झाडाची काळजी घेतील.

भुसे म्हणाले, पुढील वर्षांपासून इयत्ता चौथी आणि सातवीचे विद्यार्थी देखील शिष्यवृत्ती परीक्षेला बसू शकतील. शाळांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी विविध शासकीय योजनांद्वारे पायाभूत सुविधांचा विकास करावा. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळा दत्तक घ्याव्यात. काही शाळांबाहेरील पानटपऱ्यांवर कारवाई करावी. यासोबतच आधार, अपार आयडी पडताळणी, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम आदी विषयांचाही भुसे यांना आढावा घेतला.

चर्नी रोड येथे बालभवन प्रकल्पाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात आहे. वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना बालभवन येथे शैक्षणिक सहलीसाठी आणावे. त्यांच्यातील कलागुणांना यामुळे वाव मिळू शकतो. सोबतच कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना या बालभवनचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास  भुसे यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांचे अपार, आधार पडताळणी करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीवर लक्ष केंद्रीत करा. पीएमश्री शाळा उपक्रमात सहभागी व्हा, महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ करण्यासाठी उपाययोजना आखा, आयडॉल शिक्षक बँक तयार करा, या आयडॉल शिक्षकांचा इतर शाळांमधील शालेय उपक्रमात सहभाग वाढवा आदी सूचना भुसे यांनी केल्या.

शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढला असला तरी विद्यार्थ्यांची मातीशी असलेली नाळ तुटणार नाही यावरही आपल्याला लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच शाळांमध्ये दरवर्षी स्नेहसंमेलने, क्रीडा स्पर्धा आयोजित करा. आठवीनंतरच्या विद्यार्थिनींसाठी शाळांमध्ये पिंक रुम तयार करा, यापुढे मुलांना शालेय जीवनापासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्याबाबत विचार सुरू असून, लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. शिक्षक समायोजनाबाबत आठ दिवसात अहवाल सादर करून शिक्षकांचे समायोजन करा, अशा सूचनाही भुसे यांनी केल्या.

उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका राबवित असलेल्या शैक्षणिक उपक्रम, अभ्यासपद्धतींची माहिती दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!