spot_img
spot_img
spot_img

पुणे विद्यापीठाचा ६४८ कोटी रुपये खर्च असलेला अर्थसंकल्प सादर!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे, ता. २२ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण ५६६ कोटी रुपये जमा आणि ६४८ कोटी रुपये खर्च असलेला अर्थसंकल्प मांडण्यात आला. अर्थसंकल्पात चार शिष्यवृत्ती योजना, संशोधन, गुणवत्तावाढ, विद्यार्थी विकास, विद्यार्थी वसतिगृह अशा घटकांवरील भरीव तरतूद करण्यात आली आहे.

विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा शनिवारी झाली. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिसभेला प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे आदी उपस्थित होते. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाला अधिसभेने मान्यता दिली.

अर्थसंकल्पात विद्यार्थी विषयक सेवा व सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रम, उपकेंद्रांचे बांधकाम यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच संशोधन प्रकल्प प्रसिद्धी, नाविन्यता जागरुकता योजना, बौद्धिक संपदा हक्क यासाठीही अर्थसंकल्पात विशेष तरतुद करण्यात आली आहे. संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी वसतिगृहाच्या चौदा मजली दोन स्वतंत्र इमारती बांधण्यात येत आहेत. प्रत्येक वसतिगृहात ५१३ विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था होणार आहे. तसेच वसतिगृह क्षमता वाढ, आणि देखभाल आणि विकासासाठी २९ कोटी ५६ लाख रुपयांची तरतुद आहे.

विद्यार्थ्यांसाठीच्या चार शिष्यवृत्तींसाठीची तरतूद एक कोटी ८५ लाख रुपयांनी वाढवण्यात आली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजनेसाठी १ कोटी २५ लाख रुपये, महात्मा जोतीराव फुले अर्थसहाय्य योजनेसाठी २ कोटी ३० लाख रुपये, राजर्षी छत्रपती शाहू महाराज अर्थसहाय्य योजनेसाठी २ कोटी ३० लाख रुपये, स्वामी विवेकानंद अर्थसहाय्य योजनेसाठी २ कोटी २५ लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्याशिवाय कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेअंतर्गत ७ कोटी ५० लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!