spot_img
spot_img
spot_img

सन्मती बाल निकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित सन्मती बाल निकेतन व तिर्थरूप शैक्षणिक वसतिगृह, मांजरी बु||, पुणे आणि मंगलम योग यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात माई सभागृहात ‘हीच अमुची प्रार्थना’ या सामुदायिक प्रार्थनेने झाली. त्यानंतर माईंच्या प्रतिमेचे पूजन आणि उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. महेश कोटुळे यांनी योग दिनाचे महत्त्व सांगत, योग ही केवळ शरीराची क्रिया नसून ती शिस्त, समतोल आणि समाजाशी नाते जोडणारी शक्ती आहे असे प्रतिपादन केले.

या विशेष दिवशी योग सत्राचे मार्गदर्शन डॉ. हर्षा बोरा आणि कायना काकड या दोघांनी केले. दोन्ही प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये योगाची सुलभ आणि सकारात्मक समज निर्माण करत, विविध योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार आत्मीयतेने शिकवले. योगाची क्रियाशीलता आणि आंतरिक शांतता यांचा सुरेख समन्वय विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवला.

सत्रात “योग म्हणजे काय?” याचे मूलभूत अर्थ उलगडले गेले — युज् म्हणजे एकत्र येणे, मन, शरीर आणि आत्मा यांचे ऐक्य. विद्यार्थ्यांनी केवळ कृती नव्हे, तर त्या मागील भावनाही मनःपूर्वक समजून घेतल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधुताई सपकाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करत, योग हे आजच्या पिढीने आत्मसात करणे किती आवश्यक आहे हे समजावले. त्यांनी योगाच्या माध्यमातून स्वतःची काळजी घेणं, सामाजिक बांधिलकी जपणं आणि पर्यावरणप्रेम या तीन गोष्टींची जाणीव करून दिली, योगाचा समावेश दैनंदिन जीवनात करण्याची सामूहिक प्रतिज्ञा मुलांनी घेतली. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश शेटे यांनी तसेच प्रास्ताविक महेश कोटुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ममता सिंधुताई सपकाळ यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी केले.

“एक वसुंधरा, एक आरोग्य” या संकल्पवाक्याशी समरस होत, या कार्यक्रमातून उपस्थितांनी आत्मशुद्धी, समाजप्रेम आणि पर्यावरण सजगतेची नवी ऊर्जा अनुभवली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!