

बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील सह्याद्री फॉर्म्सचे विलास शिंदे होते. याप्रसंगी चंद्रकांत दळवी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, पीआरएम सॉफ्ट सोल्यूशन्सचे कार्यकारी संचालक राजेंद्र शिंदे, धर्मेंद्र पवार, अभिषेक दळवी, तबाजी कापसे, संजीव कोलगोड एस. बी. प्रॉडक्शन्सचे शंकर बारवे आदी उपस्थित होते. यावेळी ‘निढळ गाव: परिवर्तनाचा प्रवास’ या माहितीपटाच्या टीझर आणि पोस्टरचे अनावरण झाले. सत्व फाऊंडेशनच्या वतीने माहितीपुस्तिका प्रकाशित करण्यात आली.
नाना पाटेकर म्हणाले, “चंद्रकांत दळवी सातत्याने ४१ वर्षे हे काम करत आहेत. शासकीय सेवेतील महत्त्वाची पदे भूषवत असताना, तथाकथित विकास करणे दळवींना सहज शक्य होते. पण त्यांना अभिप्रेत ग्रामविकासाचे प्रारूप निराळे होते. सामाजिक एकोपा, लोकसहभाग आणि लोकवर्गणी यांच्या माध्यमातून त्यांनी ९० टक्के शासकीय योजनांच्या मदतीनेच ही किमया घडवून आणली आहे. त्यांच्या ग्रामविकासाला सामूहिकतेची जोड आहे. पराकोटीचे सातत्य, संयम, धीर आणि दळवींमधील नेतृत्वगुणांचे हे फलित आहे. समविचारी लोक जमवणे कठीण असते. समृद्धीची प्रत्येकाची कल्पनाही वेगळी असते. अशा परिस्थितीत दळवी यांनी स्वतःपलीकडे जाणाऱ्या समाजसेवेचा प्रत्यय दिला आहे. समाजातील युवकांची ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाणे आवश्यक आहे, त्यासाठी दळवींचे हे पुस्तक अभ्यासक्रमाचा भाग होणे आवश्यक आहे. यापुढे ग्रामविकासामध्ये नाम फाऊंडेशन दळवींच्या माडेलसोबत काम करेल.”
चंद्रकांत दळवी यांनी नाना पाटेकर यांचा ‘ग्रामीण भारतासाठी काम करणारे नायक’ असा उल्लेख करून ते पुढे म्हणाले, “शासकीय सेवेत विविध पदांवर कार्यरत असताना, राज्याची धोरणे ठरविण्याच्या महत्त्वाच्या कामात मला सहभागी होता आले. प्रत्येक पदावर काम करताना राज्याच्या हिताची एक तरी योजना ठरवण्याची संधी मिळाली. पण गावात प्रत्यक्ष काम करणे आव्हानात्मक होते. धोरणे चांगली असतील, तर विकासाचे प्रारूप लोकसहभागातून शक्य होते, याचे उदाहरण आता उभे राहिले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने समाजकार्याचे माडेल उभे राहिले आहे. हे पुस्तक लवकरच इंग्रजी व हिंदी भाषेत उपलब्ध होईल. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी ग्रामविकासाची अशी माॅडेल्स उपयोगी ठरतील. निढळ गावाच्या विकासाच्या ९० टक्के योजना शासकीय माध्यमातूनच राबविल्या आहेत.”
रामशेठ ठाकूर म्हणाले, “दळवी यांचा हा ग्रामविकासाचा पॅटर्न स्वीकारला, तर शहरांकडे धावणारे लोंढे थांबतील. शहरांची कुणाला आठवणही येणार नाही. गाव भौतिक, आर्थिक, भावनिकदृष्ट्या प्रत्येक समाजघटकाला जोडून घेऊन विकास प्रक्रियेत सहभागी होईल. हा आराखडा देशभरात उपयुक्त ठरणारा आहे.”
‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पटर्न’ हे ग्रामविकासाचे उत्तम दस्तऐवजीकरण असून, आगामी काळात ते दिशादर्शक ठरेल, असे पुस्तकाचे लेखक सुनील चव्हाण म्हणाले. कैलास कळमकर, भीमराव माने, मनोज गायकवाड, रामदास माने, संतोष ढोरे पाटील, राजेंद्र शिंदे, शंकर बारवे यांनीही मनोगत मांडले. सुनील जोशी यांनी सूत्रसंचालन केले. संजीव कुलगोड यांनी आभार मानले.