शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कासिंग डागोर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) अंतर्गत येरवडा येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींच्या शाळेला भेट देऊन शाळेतील शैक्षणिक सुविधा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला.
यावेळी बार्टीच्या निबंधक डॉ. सुचिता शिंदे, विभागप्रमुख भाग्यश्री पाटील, प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे, प्रभारी मुख्याध्यापिका जयश्री चेंडगे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
डागोर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच सकस आहार मिळेल, याबाबत दक्षता घ्यावी. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविता यावे, यासाठी शालेय स्तरापासूनच योग्य मार्गदर्शन आणि पूर्वतयारीचे शिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटका ठेवण्याबाबतही श्री. डागोर यांनी प्रशासनाला सूचना केल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही यावेळी ते म्हणाले.
यावेळी डॉ. सुचिता शिंदे, भाग्यश्री पाटील आणि नितीन सहारे यांनी बार्टी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांशी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. डागोर यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून तयार केलेल्या विविध वस्तूंची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आणि सर्जनशीलतेचे कौतुक करून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.




Total Users : 235976