पिंपरी-चिंचवड –
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री, पुणे व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या अवमानकारक आणि महिलांचा अपमान करणाऱ्या वक्तव्याचा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शेखर काटे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. अशा प्रकारची खालच्या पातळीवरील भाषा ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी असून काँग्रेसने तात्काळ याबाबत भूमिका स्पष्ट करून हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
शेखर काटे म्हणाले की, राजकारणात मतभेद असू शकतात, धोरणांवर टीका होऊ शकते, परंतु एखाद्या महिला नेत्याचा अवमान करणारी भाषा वापरणे ही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह बाब आहे. लोकशाहीमध्ये सभ्य संवादाची परंपरा जपणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी ती मर्यादा ओलांडली असून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची आणि महिला वर्गाची माफी मागितली पाहिजे.
सुनेत्रा वहिनी पवार यांनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. दिवंगत अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख विचारांचा वारसा पुढे नेत त्यांनी प्रशासनात सक्षम नेतृत्वाची छाप पाडली आहे. पुणे आणि बीड या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री म्हणून त्यांनी विकासकामांना गती दिली असून जनतेच्या प्रश्नांवर संवेदनशीलपणे काम केले आहे. महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, शेतकरी हित, उद्योग, रोजगार आणि सर्वसमावेशक विकास या क्षेत्रांत त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे.
शेखर काटे पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी आणि महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी सुनेत्रा वहिनी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर राज्यातील लाखो कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा विश्वास आहे. वैयक्तिक टीका करून त्यांच्या कार्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल.
इतिहास साक्षी आहे की, देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही विरोधकांकडून वैयक्तिक स्वरूपाच्या टीका करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण जगासमोर सक्षम नेतृत्व सिद्ध केले. त्याचप्रमाणे सुनेत्रा वहिनी पवार या देखील आपल्या कामगिरीतून जनतेचा विश्वास अधिक दृढ करत आहेत. महिलांच्या नेतृत्वाची खिल्ली उडवणारी मानसिकता महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही.
हे वक्तव्य केवळ सुनेत्रा वहिनी पवार यांच्याविरोधात नसून राज्यातील आणि देशातील प्रत्येक महिला नेतृत्वाचा अपमान आहे. महिलांचा सन्मान करण्याची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसने आपल्या प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्याकडून तातडीने जाहीर माफी मागवावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही शेखर काटे यांनी दिला.
शेवटी शेखर काटे यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या नेतृत्वाच्या सन्मानासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभा आहे. कोणत्याही महिला नेत्याचा अवमान सहन केला जाणार नाही आणि अशा प्रवृत्तीला लोकशाही मार्गाने सडेतोड उत्तर दिले जाईल.



