spot_img
spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक; पवना धरण १००% भरले तरी १५% पाणी कपात का?

गटनेते विश्वजीत बारणे यांचा आयुक्तांना सवाल
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पवना धरण पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० टक्के भरले असतानाही पिंपरी-चिंचवड शहरावर १५ टक्के पाणी कपात कशासाठी लादली आहे. ही कपात तात्काळ रद्द करून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी ठाम मागणी शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक विश्वजीत बारणे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
गटनेते विश्वजीत बारणे म्हणाले, पवना धरणातील जलसाठा मुबलक असून पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. शहरासाठी भविष्यात पाण्याची कोणतीही टंचाई नसतानाही पालिका प्रशासनाकडून १५ टक्के पाणी कपात कायम ठेवण्यात आली आहे. या अवाजवी निर्णयामुळे शहरातील लाखो नागरिकांना, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक भागात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
पाणी मुबलक असताना कपात कायम ठेवण्यामागे कोणतेही ठोस किंवा वस्तुनिष्ठ कारण नाही. या निर्णयामुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून टँकर लॉबीला आणि टँकर संस्कृतीला प्रोत्साहन दिले जात आहे की काय, अशी शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे. जनहिताचा आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून प्रशासनाने ही १५ टक्के पाणी कपात त्वरित मागे घ्यावी आणि शहरातील सर्व भागांत समान, पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी बारणे यांनी केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!