शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य अद्याप उपलब्ध झाले नसल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत, शाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आले तरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले नसल्याचा आरोप केला आहे.
कोल्हटकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील सुमारे ४२ हजार आणि माध्यमिक शाळांतील ९ हजार, असे एकूण ५१ हजार विद्यार्थी अद्याप शालेय साहित्याच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
निवेदनात त्यांनी शालेय साहित्य वितरणासाठी डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीऐवजी ठेकेदारी पद्धतीचा अवलंब करण्यात आल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. Tender No. Edu/01/2026-27 (दि. २४ जून २०२६) ही निविदा रद्द करून विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या खात्यात थेट निधी जमा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पुणे महानगरपालिकेने सुमारे ५९,६९५ विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे शालेय साहित्य खरेदीसाठी निधी जमा केला, असे उदाहरण देत पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही त्याच धर्तीवर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय, निविदा प्रक्रियेत काही ठेकेदारांना नियमबाह्य लाभ दिल्याचा तसेच मागील वर्षी निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा पुरवठा झाल्याचा आरोपही कोल्हटकर यांनी निवेदनात केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून पारदर्शक निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या आरोपांवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. प्रशासनाची भूमिका समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.



