शबनम न्यूज | प्रतिनिधी
मोहननगर, काळभोरनगर आणि आकुर्डी परिसरात गेल्या सात ते आठ दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या समस्येवर तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा नागरिकांसह महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेविका मीनल यादव यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.
यासंदर्भात मीनल यादव यांनी मंगळवारी (२१ जुलै) संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांच्या नावे निवेदन सादर केले. हे निवेदन अभियंता शिर्के आणि कनिष्ठ अभियंता शिंदे यांच्याकडे देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलले जात नाहीत किंवा समाधानकारक उत्तर मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढत असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.
निवेदनाची दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत महावितरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेविका मीनल यादव यांनी दिली.
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना न झाल्यास परिसरातील नागरिकांसह महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.



