शबनम न्यूज | प्रतिनिधी
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिखली येथील घरकुल परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नागरिकांचे नुकसान झाले होते. घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा, एसटीपीच्या दूषित पाण्याची समस्या आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी प्रश्नांबाबत नुकत्याच झालेल्या जनआक्रोश आंदोलनानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेतली असून, सकाळी १०.३० वाजता महापौर रवी लांडगे यांनी संबंधित महानगरपालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसह घरकुल परिसराची पाहणी केली.
यापूर्वी झालेल्या स्थळ पाहणीदरम्यान नागरिकांना लवकरच सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह पुन्हा भेट देऊन समस्येचे मूळ कारण शोधून त्यावर शाश्वत उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन महापौरांनी दिले होते. त्या अनुषंगाने आज जलनिस्सारण, स्थापत्य, पाणीपुरवठा तसेच इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यावेळी पाणी साचण्यामागील तांत्रिक कारणांचा सखोल आढावा घेण्यात आला. पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना, जलवाहिन्या व नाल्यांची क्षमता, अडथळे दूर करणे तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत नियोजन करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले.
नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून, आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
या पाहणीदरम्यान फ प्रभाग अध्यक्षा शिवानी नरळे, नगरसदस्य कुंदन गायकवाड, निलेश नेवाळे,नगरसदस्या योगिता नागरगोजे, रिटा सानप, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी प्रेरणा सिनकर, उपायुक्त अण्णा बोदडे,क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील कार्यकारी अभियंता शिवाजी चौरे, हरविंदर बन्सल,सोहन निकम आदी उपस्थित होते.



