spot_img
spot_img
spot_img

‘एआय’ला स्पर्धक नव्हे, तर विचारशक्ती वाढविणारे साधन बनवा – विवेक सावंत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

“आजचे जग कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) आहे. एआयला स्पर्धक नव्हे, तर विचारशक्ती वाढविणारे साधन म्हणून स्वीकारा. तंत्रज्ञान नोकऱ्या संपवत नाही, तर नव्या प्रकारच्या रोजगारसंधी निर्माण करते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, क्षमता आणि करिअरच्या नव्या वाटांचा शोध घेत कौशल्याधारित शिक्षण आणि नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा,” असे प्रतिपादन महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल)चे संस्थापक-संचालक विवेक सावंत यांनी केले.

पुणे विद्यार्थी गृहाच्या विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा रौप्यमहोत्सवी २५ व्या वर्धापनदिवस सोहळ्यात सावंत बोलत होते. कुलगुरू दादासाहेब केतकर सभागृहात आयोजित सोहळ्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, उपकार्याध्यक्ष अमोल जोशी, कार्यवाह संजय गुंजाळ, खजिनदार कृष्णाजी कुलकर्णी, संस्थेचे संचालक सुनील रेडेकर, पौर्णिमा लिखिते, रमेश कुलकर्णी, राजेंद्र कडूसकर, महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र कांबळे, प्राचार्य डॉ. संजयकुमार गायकवाड, उपप्राचार्य प्रा. रेखा जोशी, प्रा. स्वाती जोशी आदी उपस्थित होते.

विवेक सावंत म्हणाले, “मानवी बुद्धी ही ‘यूज इट ऑर लूज इट’ या तत्त्वावर कार्य करते. त्यामुळे साचेबंद विचारांमध्ये अडकून न राहता समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि कौशल्ये विकसित करा. यंत्रांसारखे काम करू नका; एआयचा वापर स्वतःची विचारशक्ती अधिक सक्षम करण्यासाठी करा. शिक्षण आणि रोजगार क्षेत्रातील हा संक्रमणाचा काळ आहे. सामाजिक माध्यमांचा अनावश्यक वापर कमी करून मेहनत, संयम, टीम स्पिरिट आणि सॉफ्ट स्किल्स विकसित करा. कौशल्याधारित, उद्योगाभिमुख आणि तंत्रज्ञानस्नेही शिक्षणामुळे भविष्यातील रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. समाजासाठी उपयुक्त आणि उत्पादक ज्ञान मिळविण्यावर भर द्या.”

डॉ. पराग काळकर म्हणाले, “शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल होत असून पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच तंत्रज्ञानयुक्त, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज वाढली आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्ञानाचे कृतीत रूपांतर करण्यावर भर दिला जात आहे. शिक्षणसंस्थांनी पदवी आणि उद्योगातील अनुभव यांचा प्रभावी मेळ घालून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे. नव्या व्यवस्थेच्या गरजा ओळखून सक्षम, कुशल आणि उद्योगस्नेही मनुष्यबळ तयार करणे ही काळाची गरज असून, शिक्षणसंस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा.”

परशुराम वाडेकर म्हणाले, “परिस्थिती सुधारायची असेल, तर चांगले शिक्षण घेणे गरजेचे आहे. पुणे विद्यार्थी गृहाने गेल्या शंभर वर्षात लाखो गरीब व गरजू विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले आहे. संस्थेच्या कार्याला पूरक काम करीत विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयानेही रोजगारक्षम व उद्योगाभिमुख युवकांच्या पिढ्या घडवल्या आहेत. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी सोहळा सर्वत्र उत्साहात साजरा व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जुन्याकाळी स्थापन झालेल्या या संस्थांनी कालानुरूप बदल स्वीकारले. मात्र, मूल्यांशी तडजोड न करता उत्तम नागरिक घडविण्याचे कार्य सुरु ठेवले आहे.”

राजेंद्र बोऱ्हाडे म्हणाले, “विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने गेल्या २५ वर्षांत गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. बदलत्या काळानुसार कौशल्याधारित, उद्योगाभिमुख आणि तंत्रज्ञानस्नेही शिक्षण देण्यावर संस्थेचा भर राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत शिक्षणाबरोबरच संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांना सक्षम करण्याचे कार्य सुरु आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे.”

प्रा. डॉ. राजेंद्र कांबळे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या २५ वर्षांच्या जडणघडणीचा आढावा घेतला. यावेळी महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या पदाधिकारी, कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. रौप्यमहोत्सवी वाटचालीचा वेध घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. प्रा. तेजल चोथे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. संजयकुमार गायकवाड यांनी आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!