शबनम न्यूज | प्रतिनिधी
पवना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील १५ टक्के पाणीकपात तात्काळ रद्द करून पूर्ववत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी ठाम मागणी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काही दिवसांपूर्वी पवना धरणात केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून महापालिकेने शहरातील पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात केली होती. तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेतही कपात करून नियोजन करण्यात आले होते. त्या निर्णयाला शहरवासीयांनीही सहकार्य करत पाणी बचतीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि सततच्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा तब्बल ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची भीती मोठ्या प्रमाणात दूर झाली असून धरणातील पाणीस्थिती समाधानकारक बनली आहे.
असे असतानाही शहरात अद्याप १५ टक्के पाणीकपात आणि कमी वेळेचा पाणीपुरवठा सुरू असल्याने अनेक भागांतील नागरिकांना दैनंदिन अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियमित वेळेनुसार आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत असल्याचे नाना काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
पवना धरणातील वाढलेला पाणीसाठा लक्षात घेता पाणीपुरवठ्यावरील सर्व निर्बंध तात्काळ हटवून १५ टक्के कपात रद्द करावी, तसेच पाणीपुरवठ्याची वेळ पूर्ववत करून नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित या महत्त्वाच्या विषयावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही नाना काटे यांनी व्यक्त केली आहे.


