शबनम न्यूज | प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस, वाहतूक शाखा आणि महापालिका प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. यंदा पालखी सोहळ्यासाठी तब्बल ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून अत्याधुनिक एआय कॅमेरे, ड्रोन आणि मोबाईल कंट्रोल व्हॅनच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवली जाणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा १० जुलै रोजी पुण्यात मुक्काम असणार आहे. विश्रांतवाडी चौक, संचेती चौक, अलका चौक तसेच इतर मुक्कामस्थळी विशेष सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून पोलिसांकडून त्याची पूर्वतयारी आणि रंगीत तालीमही घेण्यात आली आहे.
११ जुलै रोजी पालखी दोन वेगवेगळ्या मार्गाने पुढे प्रस्थान करणार असल्याने त्या मार्गांवर वाहतूक व्यवस्थेचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी पर्यायी मार्ग, वाहतूक नियंत्रण आणि सूचना प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.
सुरक्षेसाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी एआय-आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. फेस रिकग्निशन, संशयित व्यक्तींची ओळख, हरवलेल्या व्यक्तींचा शोध तसेच वाहन ट्रॅकिंगसाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. याशिवाय ड्रोनद्वारे गर्दी आणि वाहतुकीवर हवाई नजर ठेवली जाईल.
पोलीस प्रशासनाने मोबाईल कंट्रोल व्हॅनचीही व्यवस्था केली असून या व्हॅन मिनी कंट्रोल रूमप्रमाणे कार्य करणार आहेत. घटनास्थळी तात्काळ माहिती संकलन, समन्वय आणि नियंत्रणासाठी त्यांचा उपयोग होणार आहे.
वारीदरम्यान नागरिकांना आणि वारकऱ्यांना वेळोवेळी अलर्ट संदेश पाठविण्यात येणार आहेत. हे संदेश व्हॉट्सअॅपसह विविध माध्यमांतून प्रसारित केले जाणार असून वाहतूक बदल, गर्दीची स्थिती आणि आपत्कालीन सूचना यांचा त्यात समावेश असेल.
गर्दी व्यवस्थापनासाठी प्रत्येक पालखीसोबत विशेष पोलिस पथके तैनात राहणार आहेत. नातेपुते परिसरातून सुमारे २०० स्वयंसेवकांना मदतीसाठी बोलावण्यात आले असून मुक्कामाच्या गर्दीच्या २० संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करण्यात येणार आहे.
दरम्यान, पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरस्थिती निर्माण झाल्यास महापालिका आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे तातडीची कारवाई करण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. गेल्या काही दिवसांत २९ ठिकाणी पाणी साचण्याची किंवा अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
VVIP आगमन आणि दर्शन व्यवस्थेसाठीही स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या व्यवस्थेला यंदा अधिक सक्षम स्वरूप देण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची मदत अवघ्या सात मिनिटांत उपलब्ध होईल, असा दावाही अधिकाऱ्यांनी केला.
वारी सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडावा यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवून काम सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.


