पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
दिघी परिसरात उसने दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी ५५ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिला दोन दिवस खोलीत डांबून ठेवत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा नागोराव आबळे (वय ५५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी मलिता रोहिदास राठोड, रोहिदास प्रेम राठोड आणि त्यांचा साथीदार अनिल चव्हाण यांनी उसने दिलेल्या पैशांच्या वादातून फिर्यादी महिलेला तिच्या राहत्या घरातून जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून नेले.
यानंतर आरोपींनी महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली आणि सोलापूर जिल्ह्यातील आरोपीच्या घरातील एका खोलीत १ जुलैपर्यंत डांबून ठेवले. दरम्यान, महिलेचा मुलगा तुकाराम आबळे याने दिघी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून पीडितेची सुटका केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३), ११५(२), ३५२, ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मलिता राठोड व रोहिदास राठोड यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.



