पुणे, प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक १९ मधील कोंढवा खुर्द-कौसरबाग येथील अशरफ नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते, ड्रेनेज तसेच पथदिव्यांच्या समस्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. निवडणूक आचारसंहितेमुळे ही कामे रखडली होती. मात्र, आचारसंहिता संपल्यानंतर आता या सर्व प्रलंबित विकासकामांना गती देण्यात येणार असल्याचे आश्वासन नगरसेविका तस्लीम हसन भाई शेख यांनी दिले आहे.
तस्लीम शेख यांनी सांगितले की, आचारसंहितेच्या कालावधीतही त्यांनी अशरफ नगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. आता आचारसंहिता संपल्यामुळे रस्ते, ड्रेनेज, पथदिवे आणि इतर मूलभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार आहेत.
“अशरफ नगर परिसर स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत आणण्याचा आमचा संकल्प असून, नागरिकांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे तस्लीम शेख यांनी सांगितले.
यावेळी मोहसीन हसन शेख, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, यांनीही परिसरातील विकासकामे तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
अशरफ नगर परिसरातील रखडलेल्या विकासकामांना आता गती मिळणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



