पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चिखली-कुदळवाडी परिसरात मंगळवारी (दि. ९ जून) पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई राबविल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईदरम्यान मुस्लिम समाजाशी संबंधित पाच धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष बाब म्हणजे, या कारवाईच्या काही तासांपूर्वीच स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते अर्शद अस्लम खान यांनी नागरिकांसह पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. या निवेदनात अतिक्रमण कारवाईमध्ये पारदर्शकता राखावी, कोणत्याही एका समाजाला लक्ष्य केल्याचा आभास निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि सर्वांसाठी समान न्यायाची भूमिका स्वीकारावी, अशी मागणी करण्यात आली होती.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील अनेक अनधिकृत बांधकामे दंड आकारून अथवा विविध प्रक्रियांद्वारे नियमित करण्यात आली आहेत. मात्र, चिखली-कुदळवाडी परिसरातील रहिवाशांना अशा प्रकारची संधी नाकारली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अद्यापही पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था आणि इतर मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले होते.
यापूर्वी १० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईत प्रार्थनास्थळे, दुकाने, लघुउद्योग आणि काही निवासस्थाने पाडण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढीस लागल्याचे चित्र आहे.
कारवाईनंतर परिसरात नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “जर अतिक्रमण हटविण्याची मोहीम संपूर्ण शहरभर राबविली जात असेल, तर वारंवार त्याच भागातील आणि विशिष्ट समाजाशी संबंधित बांधकामांवरच बुलडोझर का चालवला जातो?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
अर्शद खान यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आमचा कायद्याला विरोध नाही. अतिक्रमणांवर कारवाई करणे हा प्रशासनाचा अधिकार आहे. मात्र, ती कारवाई सर्वांसाठी समान निकषांवर आणि पूर्ण पारदर्शकतेने व्हावी. कोणत्याही एका समाजाला लक्ष्य केल्याचा संशय निर्माण होणार नाही, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.”
दरम्यान, या कारवाईमुळे चिखली-कुदळवाडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी न्याय मिळविण्यासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संबंधित कारवाईबाबत महानगरपालिकेची अधिकृत भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू असून, प्रशासनाकडून प्रतिक्रिया प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
* पहाटे ३ वाजता चिखली-कुदळवाडीत महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई
* पाच धार्मिक स्थळे पाडल्याचा स्थानिकांचा आरोप
* कारवाईपूर्वीच आयुक्तांना निवेदन देऊन पारदर्शकतेची मागणी
* “विशिष्ट समाजाला लक्ष्य केले जात आहे का?” असा नागरिकांचा सवाल
* न्यायासाठी कायदेशीर लढ्याची नागरिकांची तयारी
* प्रशासनाच्या अधिकृत भूमिकेकडे सर्वांचे लक्ष



