spot_img
spot_img
spot_img

‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीपोटी कोट्यवधींची लूट: सुशिक्षित नागरिकही सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात!

ज्येष्ठ पत्रकार सुचेता दलाल यांचे मत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सायबर गुन्हेगार केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नसून मानवी मानसिकतेशी खेळत आहेत. ‘डिजिटल अरेस्ट’ ही केवळ पैशांची लूट नाही तर , पीडित व्यक्तीच्या मनात भीतीचे साम्राज्य निर्माण करून त्याला मानसिकदृष्ट्या ताब्यात घेण्याची आणि सुशिक्षित नागरिकांना जाळ्यात ओढण्याची एक अत्यंत नियोजनबद्ध पद्धत आहे,” असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार सुचेता दलाल यांनी व्यक्त केले.
लेखक शशांक वाघ लिखित ‘एव्हरीथिंग इज फेअर’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. शिरीष देशपांडे, पत्रकार मुकुंद लेले, सायबर तपास तज्ञ धनंजय देशपांडे, राजीव मोडक, श्रेयस पाटणकर, शुभांगी वाघ, डॉ. केतकी वाघ उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लेखक शशांक वाघ लिखित ‘एव्हरीथिंग इज फेअर’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
सुचेता दलाल म्हणाल्या, सायबर गुन्हे आणि डिजिटल अरेस्टवर अनेक तांत्रिक व कायदेशीर पुस्तके किंवा शोधनिबंध उपलब्ध आहेत; परंतु शशांक यांचे हे पुस्तक एका खिळवून ठेवणाऱ्या, वेगवान कादंबरीच्या स्वरूपात असल्याने ते विशेष ठरते. पुस्तकातील मुख्य पात्र ‘गुंड्या भाऊ’ हा एक निवृत्त बँक अधिकारी असून तो स्वतः सायबर गुन्ह्यांबद्दल अत्यंत जागरूक आहे. त्याची मुलेही त्याला अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला देत असतात. तरीही, तो एका हुशार सायबर गुन्हेगाराच्या ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात फसतो. तांत्रिक भाषेतील नीरस इशारे वाचण्याऐवजी, अशा रंजक कथेच्या माध्यमातून सामान्य वाचकांपर्यंत सायबर धोके अधिक प्रभावीपणे पोहोचू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“आपण काहीही चुकीचे केले नसताना केवळ फोन कॉलवरून इतके का घाबरतो आणि कष्टाचे कोट्यवधी रुपये गुन्हेगारांच्या खात्यावर का वर्ग करतो?” या प्रश्नाचे विश्लेषण करताना दलाल यांनी मानवी मेंदूच्या रचनेचा दाखला दिला.
त्या म्हणाल्या, “जेव्हा सायबर गुन्हेगार फोन करतात, तेव्हा ते पीडित व्यक्तीच्या मनात अत्यंत हुशारीने तीव्र भीती आणि घबराट निर्माण करतात. अशा वेळी माणसाची तर्कसंगत विचार करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता पूर्णपणे संपुष्टात येते. गुन्हेगार केवळ साधा कॉल करत नाहीत, तर ते भ्रष्ट पोलीस अधिकारी व वकिलांच्या मदतीने तयार केलेल्या संवादांचे हुबेहूब सादरीकरण करतात. व्हिडिओ कॉल दरम्यान पार्श्वभूमीला प्रत्यक्ष न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाची वेबसाईट आणि अगदी न्यायाधीशांच्या भूमिकेत वावरणारी व्यक्ती उभी करून पीडितेच्या मनावर पूर्ण ताबा मिळवला जातो. त्यानंतर पीडित व्यक्तीला कोणाशीही बोलू न देता ‘डिजिटल कस्टडी’मध्ये ठेवून बँक खाती रिकामी केली जातात.
देशातील क्लिष्ट कायदेशीर व्यवस्थेवर बोट ठेवले. त्या म्हणाल्या, “आपली न्यायव्यवस्था अत्यंत संथ आणि खर्चिक बनली आहे, याची लोकांना जाणीव आहे. निरपराध असतानाही जर कोणी आपल्याला खोट्या केसमध्ये (उदा. मनी लाँड्रिंग, ड्रग्ज किंवा अनैतिक मानवी व्यापार) अडकवले, तर स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी न्यायालयाच्या चकरा मारण्यात २० ते २५ वर्षे निघून जातील, अशी भीती सुशिक्षितांच्या मनात असते.
सायबर गुन्हे आता केवळ डिजिटल अरेस्ट पुरते मर्यादित राहिलेले नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता (Generative AI) तंत्रज्ञानाचा वापर करून फेसबुक व इतर सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओंच्या आधारे लोकांचे हुबेहूब आवाज व चेहरे क्लोन केले जात आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सायबर गुन्हेगार नेहमी पोलिसांच्या चार पावले पुढे असतात; म्हणूनच नागरिकांनी स्वतः जागरूक राहणे आणि शशांक यांच्या कादंबरीसारख्या दर्जेदार साहित्यातून बोध घेणे काळाची गरज बनली आहे, असेही यावेळी सुचेत्रा दलाल यांनी सांगितले
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना खासदार डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “सायबर गुन्हेगारी हा आता केवळ आर्थिक प्रश्न उरलेला नसून ती एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. शासकीय पातळीवर सायबर गुन्ह्यांविरोधात कडक कायदे आणि यंत्रणा कार्यरत आहेत; परंतु समाज मनामध्ये याविषयीची भीती आणि अनास्था दूर करणे गरजेचे आहे. ‘एव्हरीथिंग इज फेअर’ सारख्या कादंबऱ्या समाज प्रबोधनाचे मोठे काम करतात. प्रत्येक घरात आणि ग्रंथालयात हे पुस्तक पोहोचायला हवे.”
सायबर तज्ज्ञ डॉ. धनंजय देशपांडे म्हणाले, “सायबर गुन्हेगार केवळ तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीत, तर ते मानवी भीती, आमिष आणि घाईगडबड या भावनांचा फायदा घेतात. डिजिटल जगात पाऊल ठेवताना ‘आधी शहानिशा आणि मगच व्यवहार’ हे सूत्र प्रत्येकाने पाळले पाहिजे. ही कादंबरी वाचकांना सायबर विश्वातील अंधाऱ्या बाजूची जाणीव करून देईल.”
शिरीष देशपांडे म्हणाले, सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा. गुन्हा झाल्यानंतर नागरिकांनी लगेच पोलीस यंत्रणा व बँकिंग ला माहिती द्यायला हवी. सोशल मीडियाचा जागरूकतेने वापर करायला हवा. स्वसंरक्षण हेच सूत्र आपण अंगीकारले पाहिजे.
लेखक शशांक वाघ म्हणाले, “बँकिंग क्षेत्रात दीर्घकाळ काम करताना मी अनेक निष्पाप लोकांना सायबर जाळ्यात अडकून आयुष्यभराची पुंजी गमावताना जवळून पाहिले आहे. सायबर नियमांची तांत्रिक पुस्तके वाचण्यापेक्षा कथेच्या माध्यमातून हा विषय मांडल्यास तो वाचकांच्या थेट गळ्याशी उतरतो. याच भावनेतून मी ही कादंबरी लिहिली आहे. वाचकांना खिळवून ठेवतानाच त्यांना सावध करणे हाच या मागचा मुख्य हेतू आहे.” श्रेयस पाटणकर आणि डॉ. केतकी वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बँकिंग क्षेत्रातील, महाविद्यालयीन मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रकाशन सोहळ्यानंतर मानव्य संस्थेच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्नेहल दामले यांनी मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!