“पालकांना पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थी आणि पालकांना न्याय द्यावा,” – भाऊसाहेब भोईर
शबनम न्यूज | प्रतिनिधी
दिघी येथील रेड क्लिफ स्कूलविरोधात पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, शाळेकडून NCERT पुस्तकांऐवजी महागड्या खाजगी प्रकाशनाची पुस्तके खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. या संदर्भात पालकांनी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला असून, त्यांनी शिक्षण विभागाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.
पालकांच्या तक्रारीनुसार, राज्य शासन व शिक्षण विभागाच्या निर्देशांनुसार NCERT पुस्तके वापरण्याच्या सूचना असतानाही रेड क्लिफ स्कूलने त्या निर्देशांकडे दुर्लक्ष केले आहे. शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी NCERT पुस्तकांच्या वापराबाबत परिपत्रक जारी केले होते. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागानेही पालकांना NCERT पुस्तके खरेदी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अनेक पालकांनी दोन महिन्यांपूर्वीच NCERT पुस्तके खरेदी केली होती.
मात्र, शाळेने २२ मे २०२६ रोजी आपल्या संकेतस्थळावर खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांची यादी प्रसिद्ध करून ती पुस्तके खरेदी करण्याचा आग्रह धरल्याचा आरोप पालकांनी केला आहे. NCERT पुस्तकांचा संच साधारण ८०० ते १००० रुपयांत उपलब्ध असताना, खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांची किंमत ६५०० ते ७५०० रुपये असून संपूर्ण शैक्षणिक किटसाठी सुमारे १२ हजार रुपये खर्च करावा लागत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
यासोबतच शाळेकडून मागील अनेक वर्षांपासून पालक किंवा पालक-शिक्षक संघाला विश्वासात न घेता सातत्याने फीवाढ करण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मागील चार वर्षांच्या फीवाढीचे प्रकरण शासनाकडे प्रलंबित असतानाही पुन्हा फीवाढ करण्यात येत असल्याने पालक संतप्त झाले आहेत.
यापूर्वीही पालकांनी या प्रश्नावर पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर आंदोलन केले होते. त्यावेळी आश्वासने देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी शिक्षण विभागाकडे निवेदन सादर करून रेड क्लिफ स्कूलला NCERT पुस्तके वापरण्याचे कठोर लेखी आदेश देण्याची मागणी केली आहे. तसेच महागड्या खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांची सक्ती थांबवणे, आदेशाचे उल्लंघन झाल्यास शाळेविरुद्ध कारवाई करणे, प्रलंबित फीवाढ प्रकरणाचा तातडीने निकाल लावणे आणि पालकांना लेखी स्वरूपात निर्णय कळवण्याची मागणी करण्यात आली आहे.
“पालकांना पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थी आणि पालकांना न्याय द्यावा,” अशी मागणी भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.


