spot_img
spot_img
spot_img
spot_img

विश्वबंधुता परिवारातर्फे पंचरंगी कार्यक्रमातून विश्वबंधुतेचा जागर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

“विश्वबंधुतेचा विचार केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीतून समाजात रुजविण्याचे कार्य प्रकाश रोकडे यांनी आयुष्यभर केले आहे. पाच दशकांहून अधिक काळ विश्वबंधुतेचा ध्यास घेऊन समर्पित भावनेने बंधुतेचा विचार पेरणाऱ्या रोकडे यांच्या जीवनप्रवासातून समाजाला प्रेरणा आणि दिशा मिळते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका ऍड. प्रार्थना सदावर्ते यांनी केले.

विश्वबंधुता साहित्य परिषद, विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समिती आणि काषाय प्रकाशन यांच्या वतीने बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त विश्वबंधुता दिन, प्रकाश रोकडे यांचे अभिष्टचिंतन, ‘विश्वधर्म बंधुता’ ग्रंथाचे प्रकाशन, काव्य संमेलन आणि पुरस्कार वितरण अशा पंचरंगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित कार्यक्रमात जयवंत शिक्षण प्रसारक मंडळीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. वसंत बुगडे, ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, डॉ. अशोककुमार पगारिया, बंधुता प्रकाशनाच्या संचालिका मंदाकिनी रोकडे, कादंबरीकार प्रा. शंकर आथरे आणि कवयित्री संगीता झिंजुरके आदी उपस्थित होते. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या हडपसर येथील जयवंत पब्लिक स्कुलमधील विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती.

विश्वबंधुता काव्यसंमेलनामध्ये महाराष्ट्रातील २५ नामवंत कवी सहभागी झाले होते. निशा खापरे (नागपूर), वैशाली मोहिते (पुणे), पूनम सोनवणे (बारामती), भगतसिंग दंडवते (पनवेल), गिरीजा भुमरे व आर. पी. शिखरे (छत्रपती संभाजीनगर), दीपक नागरे (वाशीम), रुचिरा बेटकर (नांदेड), पंडित निंबाळकर (कोपरगाव), संध्याराणी कोल्हे (धाराशिव), देवीलाल वैराळे (अमरावती) व पोपटराजे कुंभारकर (सांगली) या १२ साहित्यिकांना ‘विश्वबंधुता प्रकाशदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ऍड. प्रार्थना सदावर्ते म्हणाल्या, “विश्वबंधुता, मानवता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा प्रसार करणारे साहित्य समाजाला नवी दिशा देते. गौतम बुद्ध, भगवान महावीर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे महत्त्व आपण समजून घ्यायला हवे. ‘जो आपल्या आईच्या चेहऱ्यावरील भाव वाचू शकतो तो खरा साक्षर, आणि जो ते वाचू शकत नाही तो निरक्षर’, ही रोकडे यांनी मांडलेली व्याख्या अत्यंत प्रभावी  आहे.”

प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी विश्वबंधुतेवर आधारित प्रेरणादायी गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. रोकडे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “माझ्या जागी एखाद्या प्रसिद्ध साहित्यिकाला किंवा नामवंत व्यक्तीला बोलावता आले असते; मात्र माझ्यासोबत त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी मला निवडले, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे सांगितले. संस्थेची कार्यपद्धती, सामाजिक बांधिलकी आणि संस्थेने केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

डॉ. वसंत बुगडे, डॉ. अशोककुमार पगारिया यांनीही मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी स्वागत केले. प्रा. शरयू पवार यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शंकर आथरे यांनी आभार मानले. डॉ. बंडोपंत कांबळे, डॉ. सविता पाटील, सीमा गांधी, विद्या अटक, प्रा. प्रशांत रोकडे, तुकाराम कांबळे, प्रा. सायली गोसावी आणि सुनील बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!