शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणि पोलीस प्रशासनाच्या अपुऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे विद्यमान पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पिंपरी-चिंचवड शहराचे कार्याध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात तायडे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड हे राज्यातील प्रमुख औद्योगिक, शैक्षणिक आणि रोजगाराचे केंद्र असतानाही गेल्या काही काळात शहरातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. विषारी दारू प्रकरण, महिलांवरील अत्याचार, खून, टोळीगिरी, खंडणी, मादक पदार्थांची विक्री आणि गोळीबाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिंचवड आणि संत तुकाराम नगर परिसरात वाहनांची तोडफोड, भररस्त्यात वाहनांवर हल्ले तसेच शहरातील विविध भागांत खुलेआम सुरू असलेले देहविक्रीचे प्रकार यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच अवैध गुटखा विक्री, मटका, लॉटरी आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने पोलीस यंत्रणेवरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तायडे यांनी सध्याच्या पोलीस आयुक्तांनी रात्री १० नंतर लागू केलेल्या निर्बंधांवरही टीका केली आहे. हे निर्बंध गुन्हेगारी रोखण्यात प्रभावी ठरत नसून सामान्य नागरिक, नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आणि महिलांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीची उच्चस्तरीय चौकशी, गुन्हेगारीस कारणीभूत प्रशासकीय त्रुटींचा तपास, विषारी दारू प्रकरणासह गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती, संवेदनशील भागांमध्ये विशेष गुन्हेगारीविरोधी मोहीम आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवून विद्यमान पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करून त्यांच्या जागी सक्षम व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



