शबनम न्यूज | प्रतिनिधी
देशभरात वाढत असलेल्या गोवंश तस्करी, अवैध वाहतूक आणि कत्तलीच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते जुबेर खान यांनी केंद्र सरकारकडे गाय व तिच्या संपूर्ण वंशाला संवैधानिक पद्धतीने “राष्ट्रीय पशू” घोषित करण्याची जोरदार मागणी केली आहे.
देशातील गोवंश संरक्षणासाठी तातडीने कठोर कायदा करण्यात यावा, तसेच गोवंश निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर त्वरित कारवाई करून त्या सील करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. गाय खरेदी-विक्री, अवैध वाहतूक आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केंद्र व राज्य सरकारला केले.
जुबेर खान म्हणाले की, “गाय ही देशातील कोट्यवधी नागरिकांच्या श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. त्यामुळे गोवंश संरक्षणासाठी केवळ घोषणा नव्हे, तर प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे.”
यासोबतच देशातील सर्व गाव आणि शहरांमध्ये गाय व तिच्या वंशाची अधिकृत नोंदणी आणि ऑडिट करण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली. यासाठी तातडीने केंद्रीय मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावून राष्ट्रीय स्तरावर कठोर धोरण जाहीर करावे, असेही त्यांनी नमूद केले.
गोवंश संरक्षणाचा प्रश्न हा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक अस्मितेशी जोडलेला असल्याचे सांगत सरकारने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.



