नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करा ; दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्यात सध्या विविध खाजगी क्लासेसच्या माध्यमातून अनेक गंभीर प्रकार समोर येत असून काही ठिकाणी आर्थिक फसवणूक, मानसिक दबाव, विद्यार्थ्यांच्या भावनांवर प्रभाव टाकणे, अंधश्रद्धा पसरविणे किंवा तथाकथित “मंत्र उपचार” यांसारख्या धक्कादायक बाबी उघड होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर मानसिक किंवा भावनिक प्रभाव टाकण्याचे प्रकार वाढताना दिसत असून यावर शासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
तसेच दुर्गा भोर यांनी नीट (NEET) परीक्षेच्या विद्यार्थ्यांसंदर्भातही महत्त्वाची मागणी करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास, डिजिटल टेस्ट सिरीज, फॉर्म प्रक्रिया आणि शैक्षणिक तयारीसाठी लागणाऱ्या इंटरनेट सेवेचा खर्च तसेच येणाऱ्या शैक्षणिक वर्षातील काही मूलभूत शैक्षणिक खर्चाची जबाबदारी शासनाने उचलावी. विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना हा वाढता खर्च परवडण्यासारखा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण होत आहे. आर्थिक अडचणींमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि करिअर अडचणीत येऊ नये, यासाठी शासनाने विशेष शैक्षणिक सहाय्य योजना तातडीने लागू करावी, अशी मागणी दुर्गा भोर यांनी केली.
दुर्गा भोर यांनी पुढे मागणी केली की, राज्यातील प्रत्येक खाजगी क्लासमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात यावेत. तसेच ज्या क्लासेसमध्ये सीसीटीव्ही व्यवस्था नसेल किंवा नियमांचे पालन केले जाणार नाही, त्या संस्थांवर कडक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचे सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच प्रत्येक खाजगी क्लासमधील सीसीटीव्ही फुटेजचा मर्यादित व सुरक्षित ॲक्सेस पालकांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा मानसिक, भावनिक किंवा अन्य गैरप्रकार होत असल्यास त्यावर वेळीच नियंत्रण मिळवता येईल व पालकांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असेही दुर्गा भोर यांनी सांगितले.



