शबनम न्यूज | प्रतिनिधी
आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची सर्व संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. तसेच पालखी मुक्काम, विसावा तसेच या मार्गांवर सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक सोयीसुविधांचे प्रभावी नियोजन करून सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवून कामकाज करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उत्साहात स्वागत करण्याची तयारी महानगरपालिकेच्या करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे स्वागत निगडी येथील भक्ती शक्ती चौकात केले जाते. यानंतर हा सोहळा आकुर्डी येथे मुक्कामी दोन्ही ठिकाणांची तसेच पालखी मार्गाची पाहणी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत दिघी येथील मॅगझिन चौकात केले जाते. या पालखी सोहळ्याच्या विसाव्याच्या ठिकाणासह महापालिका क्षेत्रातील कार्यक्षेत्रातील संपुर्ण पालखी मार्गाची पाहणी देखील आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.
या पाहणी दौऱ्यामध्ये अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी सहभागी होते.
निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे महापालिकेच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाच्या स्थळाची आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी पाहणी करून माहिती घेतली. यावेळी मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, मनोज सेठिया, उप आयुक्त प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, निवेदिता घार्गे, कार्यकारी अभियंता अजय सुर्यवंशी, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, सहाय्यक आरोग्याधिकारी सीताराम गायकवाड तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश नांदुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निता गायकवाड यांच्यासह महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.
यानंतर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आकुर्डी येथील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणाची पाहणी केली. तसेच दिंड्याच्या मुक्कामाचे ठिकाण असलेल्या महापालिकेच्या मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू माध्यमिक विद्यालय येथील पालखी विसावा ठिकाणाची पाहणी केली. यावेळी क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, कार्यकारी अभियंता वैशाली ननवरे आदी उपस्थित होते.
आकुर्डी येथील विसावा ठिकाणांची पाहणी केल्यानंतर आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी खराळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नाशिक फाटा रोड, दापोडी येथील पालखी विसावा आदी ठिकाणांचीही पाहणी केली व तेथे पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. यावेळी माहिती देण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी पुजा दुधनाळे, कार्यकारी अभियंता उमेश मोने, पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील आदी उपस्थित होते.
आकुर्डी येथील मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू माध्यमिक विद्यालय येथे दिंड्यांचा मुक्काम असतो. याठिकाणी शाळांमध्ये करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. खराळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नाशिक फाटा रोड, दापोडी येथील पालखी विसावा आदी ठिकाणीही त्यांनी पाहणी केली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मोशी येथील मॅगझीन चौक येथे महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात येते. याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाबाबतची देखील माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाहणी करून माहिती घेतली. यावेळी सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी परशुराम वाघमोडे, कार्यकारी अभियंता शिवराज वाडकर आदी उपस्थित होते. तसेच थोरल्या पादूका मंदिर या विसावा ठिकाणासही भेट देऊन तेथे देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
पाहणीदरम्यान पालखी मार्ग आणि विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याबाबत आयुक्तांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवा सुविधांचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात यावे. कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची दक्षता घेऊन सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून काम करावे, अशा सूचना आयुक्तांनी पाहणी दौऱ्यावेळी दिल्या.
पालखी सोहळा पावसाळ्याच्या कालावधीत होत असल्याने आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा सतर्क व सज्ज ठेवण्यात यावी. शहरातील सर्व होर्डिंग्जची पाहणी करून धोकादायक अथवा नियमबाह्य होर्डिंग्जवर तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच पालखी मार्ग, विसावा ठिकाणे आणि पार्किंग परिसरात दिशादर्शक फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत. वारकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी पालखी मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी स्वतंत्र समन्वयकांची नियुक्ती करावी, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या. वर्षानुवर्षे ज्या ठिकाणी दिड्यांचा मुक्काम असतो तेथे कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची यंत्रणा कार्यान्वित करावी, तसेच शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यात यावे. तातडीच्या वैद्यकीय सुविधांसाठी महापालिकेच्या वतीने रुग्णवाहिका, फिरता दवाखाना सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. पालखी मुक्काम स्थळे, वारकरी निवास तसेच पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
पालखी मार्गावर पावसाचे पाणी कोठेही साचणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात यावी. यासाठी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पाणी निचरा व्यवस्था आणि रस्त्यांची नियमित पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी. पालखी मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्यात यावेत. शिवाय, स्थापत्य विषयक कामे चालू असलेल्या ठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात यावेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्थेसंदर्भातील फलक तसेच महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देणारे फलक लावण्यात यावेत. तसेच प्रत्येक मुक्काम स्थळी नियंत्रण कक्ष उभारण्यात यावे, अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या. तसेच वारकऱ्यांच्या मुक्काम, विसावा आणि कार्यक्रम स्थळांवर स्वच्छता, साफसफाई आणि जंतुनाशक फवारणी नियमित करण्यात यावी. पालखी मार्गावरील तसेच परिसरातील राडारोडा, बांधकाम साहित्य आणि अडथळे हटवावेत. अग्निशमन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपकरणांसह सर्व यंत्रणा कार्यरत ठेवण्यात यावी. तसेच पालखी मार्ग, स्वागत कक्ष, मुक्काम आणि विसावा स्थळांवरील सी.सी.टी.व्ही कॅमेरे सुरू असून ते सुस्थितीत कार्यरत असल्याची खातरजमा करावी, असेही निर्देश आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.


