पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार चिखली परिसरात उघडकीस आला आहे. कृष्णानगर येथील S-2 पाण्याच्या टाकीवरून तब्बल अर्धा तास पाणी ओव्हरफ्लो होत असल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे, हा प्रकार सुरू असतानाच टाकीवरील कर्मचारी निष्काळजीपणे कपडे काढून झोपलेले असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे.
साने चौक परिसरात अचानक मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहताना दिसल्याने नागरिकांनी S-2 टाकीकडे धाव घेतली. त्यावेळी टाकीवर उपस्थित कर्मचारी परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून झोपेत असल्याचे दिसून आले. पाणी ओव्हरफ्लो होत असतानाही कर्मचाऱ्यांना याची साधी कल्पनाही नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, नगरसेविका संगीता (नानी) ताम्हाणे या टाकीवर पोहोचताच संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची अक्षरशः पळापळ सुरू झाली. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एकीकडे शहरातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. अनेक भागांत पुरेसे पाणी मिळत नसताना दुसरीकडे महानगरपालिकेचे कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. हा प्रकार महिन्यातून वारंवार घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून “मुद्दाम नागरिकांना पाणी दिले जात नाही का?” असा सवालही उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर तातडीने कठोर कारवाई व दंडात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा सर्व नागरिकांना सोबत घेऊन महानगरपालिकेवर तीव्र मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


