युनूस खतीब | प्रतिनिधी
चिखली परिसरात भटक्या कुत्र्यांना खाद्य देण्याच्या कारणावरून एका महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० मे २०२६ रोजी रात्री १२:०५ वाजण्याच्या सुमारास संतपीठ रोड, पाटीलनगर, चिखली येथे महिला फिर्यादी या भटक्या कुत्र्यांना बिस्कीट व चिकन राईस खायला देत होत्या. त्यावेळी तेथे राहणाऱ्या आरोपी जयश्री भोसले (वय ३५) व तिचे पती रामदास भोसले यांनी “येथे कुत्र्यांना काही खायला टाकू नको,” असे सांगत फिर्यादीसोबत वाद घातला.
वाद वाढल्यानंतर रामदास भोसले यांनी फिर्यादीच्या हातातील लोखंडी रॉड हिसकावून घेत फिर्यादीच्या हातावर व पायावर मारहाण केली. तसेच जयश्री भोसले हिनेही हाताने मारहाण करत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गु.रजि. नं. ३१९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहवा पेटकर करीत आहेत.


