पवित्र देहू नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत संत तुकाराम महाराज जन्मस्थान जतन, संवर्धन आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास तब्बल ४१ कोटी रुपयांची मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार , देवस्थान विश्वस्त, वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनातील मान्यवर उपस्थित होते.
देहू नगरीचा जागतिक स्तरावर विकास व्हावा, संत तुकाराम महाराजांच्या पावन भूमीचे जतन करत भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासनाने हा विकास आराखडा मंजूर केल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
यावेळी आमदार सुनील शेळके यांनी देहूच्या विकासासंदर्भातील विविध प्रश्न ठामपणे मांडत अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी प्रभावी पाठपुरावा केला. देहू-येलवाडी रस्त्याचे काम तातडीने सुरू करणे, आषाढी वारीपूर्वी पालखी मार्गाची दुरुस्ती, शहरातील पाणीपुरवठा योजना, नवीन विद्युत उपकेंद्र, यात्रा अनुदान तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या मागण्या त्यांनी बैठकीत मांडल्या. त्यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.
या विकास आराखड्यात संत तुकाराम महाराज जन्मस्थान वाड्याची पुनर्बांधणी, नवीन वास्तू उभारणी, परिसर सुशोभीकरण, आकर्षक प्रकाश व्यवस्था, बाग-बगिचे, जलविहार सुविधा तसेच भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत. तसेच देहूतील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पोलीस ठाणे उभारण्याचा निर्णयही सकारात्मक ठरला आहे.
देहूच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार सुनील शेळके हे विकासकामांबाबत नेहमीच आक्रमक आणि तत्पर असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे देहूच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. संत तुकाराम महाराजांच्या पावन भूमीचे वैभव अधिक भव्य करण्यासाठी शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी एकत्रितपणे कार्यरत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.


