spot_img
spot_img
spot_img

शानदार सशक्त नारी पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

रणरागिनी नेत्या रूपालीताई ठोंबरे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पिंपरी-चिंचवड : शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या वतीने संचालिका शबनम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला “शानदार सशक्त नारी पुरस्कार सोहळा” अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

झाशीची राणी संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा तथा सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठविणाऱ्या रणरागिनी नेत्या रूपालीताई ठोंबरे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. महिलांच्या संघर्षाचा, कार्याचा आणि समाजासाठीच्या समर्पणाचा गौरव करताना सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

शनिवार दिनांक १६ मे रोजी तारांगण सभागृह येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सुलभाताई उबाळे, सामाजिक कार्यकर्त्या प्रियाताई अण्णा बनसोडे, माजी नगरसेविका प्रियंका ताई बारसे, आरंभ सोशल फाउंडेशनच्या संचालिका सोनाली ताई तुषार हिंगे तसेच सामाजिक कार्यकर्त्या किरणताई हर्षवर्धन भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना रूपालीताई ठोंबरे पाटील यांनी महिलांना प्रेरणादायी शब्दांत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर महिला समाज परिवर्तनाची ताकद बनत आहेत. महिलांचा सन्मान हा केवळ पुरस्कारापुरता मर्यादित नसून तो समाजातील स्त्रीशक्तीच्या योगदानाची दखल आहे. हा पुरस्कार महिलांच्या जबाबदाऱ्या अधिक वाढवणारा असून समाजासाठी आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. प्रत्येक महिलेमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि महिलांच्या सहभागाशिवाय सक्षम समाजाची कल्पनाच करता येणार नाही.”

त्यांच्या प्रभावी मनोगताने उपस्थित महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी महिलांनी निर्भयपणे पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात नगरसेविका सुलभाताई उबाळे, सामाजिक कार्यकर्त्या प्रियाताई अण्णा बनसोडे, माजी नगरसेविका प्रियंका ताई बारसे तसेच आरंभ सोशल फाउंडेशनच्या संचालिका सोनाली ताई तुषार हिंगे यांनी आपल्या मनोगतातून महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. महिलांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांमध्ये आत्मविश्वासाने पुढे येत नेतृत्व करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

समाजात महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा पुरस्कार सोहळ्यांची मोठी गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पुरस्कार प्राप्त महिलांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि भविष्यातही समाजासाठी अधिक जोमाने कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये नगरसेविका दीप्ती अंबरनाथ कांबळे, अर्चना विनोद तापकीर, अरुणा गणेश लंगोटे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या ऐश्वर्या अमित बाबर, रेणुका विजय हेगडे, मेघाली विटकर-कुंभार, मालिका नितीन साकळे, शितल संतोष शिंदे, रुपाली सचिन वाल्हेकर, अनुराधा आनंद दौंड तसेच पत्रकार अमृता बाजीराव ओंबाळे यांचा समावेश होता.

या सर्व महिला आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणत असून महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, शिक्षण, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजाला नवी दिशा देत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणजेच “शानदार सशक्त नारी पुरस्कार” असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

संभाजी बाळासाहेब बारणे यांचाअभिमानास्पद सन्मान

या शानदार सशक्त नारी पुरस्कार सोहळ्यात एक विशेष आणि अभिमानास्पद सन्मान करण्यात आला तो म्हणजे थेरगाव परिसरातील सर्वांचे परिचयाचे संभाजी बाळासाहेब बारणे यांचा.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित तब्बल १५१ शिवचरित्रांचे संकलन करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे एकदा नव्हे तर दोन वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणारे देशातील एकमेव व्यक्ती म्हणून संभाजी बाळासाहेब बारणे यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

त्यांच्या या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला अभिमान वाटत असून सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जतनासाठी त्यांनी केलेले कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सभागृहात टाळ्यांच्याकडकडाटात त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक समाजसेविकांचा विशेष सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या हक्कांसाठी, शिक्षण, जनजागृती, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक न्यायासाठी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.

तसेच महिला सक्षमीकरणाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत स्वावलंबनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या विविध महिला बचत गटांचाही विशेष सन्मान करण्यात आला. बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून कुटुंबासह समाजाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महिलांनी एकत्र येऊन स्वावलंबन, उद्योग आणि सामाजिक प्रगतीचा घेतलेला ध्यास हा इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.

महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव आणि त्यांना प्रोत्साहन देणारा हा सोहळा समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरला.

कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची समाजाला मोठी गरज असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी शबनम सय्यद यांनी सांगितले की, “शबनम न्यूज मीडिया ग्रुप भविष्यातही समाजहित, स्त्री सक्षमीकरण आणि सकारात्मक पत्रकारितेचा ध्यास कायम ठेवत अशाच प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित ठेवणार आहे. या कार्यक्रमाची प्रस्तावना गजाला सय्यद यांनी मांडली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचान प्रसिद्ध निवेदक सोमनाथ नढे यांनी केले तर आभार आसिया इनामदार यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी शबनम न्यूज मीडिया ग्रुप टीम चे फरदीन सय्यद , युनूस खतीब , सानिया सय्यद , अनिल दळवी , जाकीर खान यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!