शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) १० मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकाचा संदर्भ देत, NEET (UG) २०२६ परीक्षेबाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता जपण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी यंदा ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा दिली होती, महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय अहवालांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.३ मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचे आणि परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ही परीक्षा रद्द करणे आवश्यक असल्याचे ‘एनटीए’ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
सीबीआय आता या पेपरफुटीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी तपास करणार आहे. दुसरीकडे, ‘एनटीए’ लवकरच परीक्षेची नवीन तारीख जाहीर करेल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता, केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आपल्या अभ्यासाचे नियोजन पुन्हा एकदा नीट करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


