spot_img
spot_img
spot_img

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे एनएचआयच्या अधिकाऱ्यांना निर्देश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महापालिका हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्ग (देहूरोड-कात्रज) बाह्यवळण मार्गावरील मामुर्डी ते वाकड दरम्यान सेवा रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने केले जात आहे.  किवळे येथे रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. येत्या १५ दिवसांत सद्यस्थितीतील निकृष्ट काम पूर्णपणे काढून टाकून नव्याने दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण करण्याचे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी एनएचआयच्या अधिकाऱ्यांना दिले.

महापालिका हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्ग (देहूरोड-कात्रज) बाह्यवळण मार्गावरील मामुर्डी ते वाकड येथील मुळा नदीवरील पुलापर्यंत दोन्ही बाजूस सेवा रस्त्यांचा विस्तार करण्यात येणार आहे. १२ मीटर अंतराने रस्त्याचा विस्तार करण्याचा आराखडा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने  तयार केला आहे. त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची खासदार बारणे यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी शिवसेना  शहर प्रमुख तथा नगरसेवक निलेश तरस, नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस, युवासेना मावळ लोकसभा राजेंद्र तरस यांच्यासह महामार्ग विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, किवळे ते वाकड दरम्यान  दोन्ही बाजूंनी बारा मीटर सेवा रस्ता विकसित केला जाणार आहे. किवळे येथे झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी निष्कृष्ट दर्जाचे काम आढळून आल्याने संबंधित अधिकारी व ठेकेदारांना कामाच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि दैनंदिन वाहतुकीशी संबंधित कामांमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. येत्या १५ दिवसांत सद्यस्थितीतील निकृष्ट काम पूर्णपणे काढून टाकून नव्याने दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण करण्याचे सक्त निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या या कामामध्ये गुणवत्ता, टिकाऊपणा आणि नागरिकांच्या सुविधेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

कामाला गती द्या

या सेवा रस्त्याची पुढील पाच वर्षे देखभाल दुरुस्ती ठेकेदारच करणार आहे. काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे. कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. समीर लॉन्स परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. पावसाळा तोंडावर येऊनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे कामाला गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!