spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 92.09 टक्के

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुरुवारी इयत्ता दहावी (एसएससी) परीक्षेचा 2026 चा निकाल जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

फेब्रुवारी-मार्च 2026 दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी राज्यभरातून 15 लाख 55 हजारांहून अधिक नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का 94.96 इतका नोंदवला गेला असून, मुलांचा निकाल 89.56 टक्के लागला आहे.

विभागनिहाय निकालात कोकण विभागाने सर्वाधिक 97.62 टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावले आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41 टक्के नोंदवला गेला.

राज्य मंडळाच्या माहितीनुसार, यंदा 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तसेच राज्यातील 6 हजार 612 शाळांनी शंभर टक्के निकालाची नोंद केली आहे.

परीक्षा प्रक्रियेत यावर्षी नकलमुक्त अभियानावर विशेष भर देण्यात आला होता. राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेख, जीपीएस सक्षम डिजिटल लॉक प्रणाली तसेच फ्लाइंग स्क्वॉडच्या माध्यमातून कडक निरीक्षण ठेवण्यात आले. परीक्षा काळात गैरप्रकारांची 402 प्रकरणे समोर आली असून, याप्रकरणी 4 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी, गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत तसेच पुनर्मूल्यांकनाची सुविधा सुरू करण्यात आली असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, अपयशी विद्यार्थ्यांनी खचून न जाता पूरक परीक्षेची संधी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!