पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर मावळ तालुक्यातील ओझर्डे हद्दीत पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव व निष्काळजी कारचालकामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास कि.मी. ७९/५०० येथे राजस्थान येथील चालक प्रविण धन्ना सिंग (वय २८) हे ट्रेलर (GJ-27 TF-9607) चालवत मुंबईहून पुण्याकडे जात होते. त्याचवेळी पाठीमागून येणारी इरटिगा कार (MH-12 ZE-5102) चालक प्रतिक सरवदे (वय २१, रा. भोसरी, पुणे) याने भरधाव वेगात, निष्काळजीपणे वाहन चालवत ट्रेलरला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत कारमधील सुनिता नारायण भट (वय ५५, रा. विले पार्ले, मुंबई) या गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडल्या. तसेच सौदागर देवीदास गायकवाड (वय ४२), बिपीन प्रजापती (वय २७, रा. म्हाळुंगे, पुणे) आणि एम. डी. नईम अकबर (वय ५३, रा. नालंदा, बिहार) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात कारचालक स्वतःही जखमी झाला आहे.
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. घटनेनंतर स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवून जखमींना रुग्णालयात हलवले.
या प्रकरणी शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चालकाविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पारखे करीत असून, एक्सप्रेसवेवरील बेदरकार वेग आणि निष्काळजी वाहनचालना पुन्हा एकदा जीवघेणी ठरत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.



