spot_img
spot_img
spot_img

तळेगाव दाभाडेत कोयत्याचा धाक दाखवत तरुणाला लुटले; एकाला अटक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

तळेगाव दाभाडे परिसरात कोयत्याचा धाक दाखवत तरुणाला जबरदस्तीने मारहाण करून रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्या तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा ते १८ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लोकमान्य शाळेच्या मागील बाजूस, तळेगाव बसस्थानकाजवळ घडली.

फिर्यादी सत्यम लक्ष्मीकांत मोरे (वय २०, रा. समता कॉलनी, वराळे, ता. मावळ) हे मित्रांसोबत दुचाकीवरून पेट्रोल भरून परत येत असताना तपकिरी रंगाच्या अॅक्सेस दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी त्यांना अडवले. आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत फिर्यादी व त्यांच्या मित्रांना जबरदस्तीने लोकमान्य शाळेजवळ नेले.

तेथे आरोपींनी आणखी दोन साथीदारांना बोलावून घेतले. चौघांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीच्या गळ्यावर कोयता ठेवून त्यांच्याकडील ६ हजार रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली.

इतक्यावर न थांबता आरोपींनी फिर्यादीला तळेगाव-चाकण रोडवरील बँक ऑफ बडोदा एटीएम केंद्रावर नेऊन ८ हजार रुपये काढण्यास भाग पाडले. अशा प्रकारे आरोपींनी एकूण १४ हजार रुपयांची जबरी लूट केली.

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९(६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात करण आनंद घाडगे (वय १९, रा. गोसावी वस्ती, तळेगाव दाभाडे) याला अटक करण्यात आली असून इतर तीन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहारे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!