शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरातील महत्त्वाचा पर्यावरणीय वारसा असलेला पाषाण तलाव सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडला असून, गेल्या पाच दिवसांपासून तलावात मोठ्या प्रमाणावर मृत माशांचा खच पडल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तलाव आधीच जलपर्णीच्या आक्रमणामुळे अडचणीत होता. आता त्यातच मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याने जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पुणे महानगरपालिका प्रशासनाने ठोस पावले उचललेली नसल्याचा आरोप होत आहे.
परिसरातील नागरिकांनी सांगितले की, तलावाच्या पाण्याची गुणवत्ता झपाट्याने खालावत असून ऑक्सिजनची कमतरता आणि प्रदूषण यामुळे मासे मरत असल्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, तात्काळ उपाययोजना न केल्यास मृत मासे थेट अधिकाऱ्यांच्या दालनात टाकण्यात येतील.
नागरिकांनी तलावाची तातडीने स्वच्छता, जलपर्णी निर्मूलन आणि पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, हा पर्यावरणीय प्रश्न आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.




