SHABNAM NEWS:
महाराष्ट्रातील वाहन पासिंग प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून अक्षरशः ठप्प झाली असून याचा फटका हजारो वाहनचालक, मालवाहतूकदार आणि व्यावसायिकांना बसत आहे. स्वयंचलित पासिंग केंद्रे अद्याप कार्यान्वित न झाल्याने राज्यातील टॅक्सी, बस, ट्रक, रिक्षा तसेच इतर प्रवासी व मालवाहू वाहनांचे पासिंग कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विनोद वरखडे यांनी खासदार पार्थ पवार यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वाहन पासिंग ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील बाब असल्याने हा मुद्दा Ministry of Road Transport and Highways कडे प्रलंबित आहे. मात्र, यामुळे स्थानिक पातळीवर वाहनधारकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील हजारो वाहनांचे पासिंग थांबल्याने नव्या वाहनांची नोंदणी, कर्ज प्रक्रिया, व्यवसायिक वाहतूक यावर परिणाम झाला असून अनेकांचे रोजचे उत्पन्न बंद पडण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत स्वयंचलित पासिंग केंद्रे पूर्णपणे सुरू होत नाहीत, तोपर्यंत पूर्वीप्रमाणे मॅन्युअल पद्धतीने पासिंग प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
यावेळी मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी वाहतूक कार्याध्यक्ष अकबर शेख, सुरज देवकर, अनुदीप येचकर, आप्पा दौंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, खासदार पार्थ पवार यांनीही या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच, भविष्यात दुबईप्रमाणे अत्याधुनिक आणि कठोर ड्रायव्हिंग टेस्ट महाराष्ट्रात लागू करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एकूणच, वाहन पासिंग ठप्प झाल्याने निर्माण झालेला हा प्रश्न केवळ प्रशासनाचा नसून, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाशी निगडित आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हस्तक्षेप करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी आता होत आहे.



