spot_img
spot_img
spot_img

मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहावे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज वीज चमकणे, गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभाग यांनी दिनांक ३० मार्च रोजी दिलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून याबाबत तातडीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

विजेचा कडकडाट सुरू झाल्यास नागरिकांनी त्वरित सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत उभे राहणे टाळावे, तसेच पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या संपर्कात राहू नये, असे सांगण्यात आले आहे.

तसेच, मोकळ्या जागेत मोबाईल फोनचा वापर टाळावा आणि जर निवाऱ्यापासून दूर असाल तर जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून बसून राहावे, अशीही सूचना देण्यात आली आहे.

प्रशासनाकडून ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णवाहिका व अग्निशमन दल सज्ज ठेवण्याबरोबरच शाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती नागरिकांसाठी सुरक्षित निवारा म्हणून खुले ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शेतकरी बांधवांनी विजेच्या इशाऱ्याच्या काळात शेतातील कामे टाळावीत, तसेच बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मोठ्या जमावाचे कार्यक्रम व यात्राही आवश्यकतेनुसार स्थगित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!