पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे गुरव येथे घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदेशीर रिफिलिंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ पकडत अटक केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गॅस साठा व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भाऊनगर, साठ फुटी रोड परिसरातील एका भाड्याच्या खोलीत आरोपी गोपाल राम अर्जुन राम विष्णोई (वय ३८) हा लोखंडी पाईपच्या सहाय्याने घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचे आढळून आले.
ही संपूर्ण प्रक्रिया कोणतीही सुरक्षेची उपाययोजना न करता अत्यंत धोकादायक पद्धतीने सुरू होती. ज्वलनशील गॅस हाताळताना आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल ४७,५०० रुपयांचा गॅस साठा व संबंधित साहित्य जप्त केले.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ व पुरवठा व वितरण नियमन आदेश २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस शिपाई आकाश खंडागळे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास सुरू आहे.



