पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
भोसरी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग करून विक्री करणाऱ्या प्रकारावर पोलिसांनी कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे.
या प्रकरणी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास भगत वस्ती, हनुमान मंदिर परिसरातील “राघव होम अॅप्लायन्स” येथे हा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी महेश माधवराव मोरे (वय ३३, रा. भोसरी) हा घरगुती वापराचा गॅस मोठ्या सिलेंडरमधून छोट्या ४ किलो सिलेंडरमध्ये भरत असल्याचे आढळून आले.
या वेळी कोणतीही सुरक्षेची उपाययोजना न करता अत्यंत ज्वलनशील गॅसचे धोकादायक पद्धतीने ट्रान्सफर सुरू असल्याने परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता.
पोलिसांनी घटनास्थळावरून गॅस सिलेंडर व रिफिलिंगसाठी लागणारे साहित्य असा एकूण २८,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ आणि (पुरवठा व वितरण नियमन) आदेश २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मयुर गारूडकर यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



