पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
पिंपरी चिंचवड दिघी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस काढून त्याची विक्री करणाऱ्या धोकादायक प्रकारावर पोलिसांनी कारवाई करत एकाला नोटीस बजावली आहे. ही कारवाई प्राईड वर्ल्ड सिटी लेबर कॅम्प परिसरात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास डी. वाय. पाटील पीसीएमटी बसस्टँडसमोर असलेल्या पार्किंगमध्ये आरोपी नारायण शिवाजी जंजाळ (वय २८, रा. लोहगाव) हा घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून नोझलच्या सहाय्याने गॅस काढून इतर सिलेंडरमध्ये भरत असल्याचे उघड झाले. या ठिकाणी सुमारे ९,८०० रुपयांचा गॅस साठा देखील आढळून आला.
विशेष म्हणजे, ज्वलनशील पदार्थ हाताळताना कोणतीही सुरक्षितता न बाळगता हा प्रकार सुरू असल्याने परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ व स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद २५ मार्च रोजी करण्यात आली असून आरोपीस बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी समीर रासकर यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.





Total Users : 213412