शबनम न्यूज | प्रतिनिधी
मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे.
या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय नागरिकांनी अनावश्यक हालचाल टाळावी, स्थानिक प्रशासन व भारतीय दूतावासांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे या ॲडव्हायझरीत नमूद करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
दूतावास परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक त्या सूचना नियमितपणे जारी करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत महाराष्ट्र शासन पूर्णतः सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.
आपत्कालीन संपर्क तपशील (संक्षेप):
रामल्ला (पॅलेस्टाईन): +970592916418
दोहा (कतार): 00974-55647502
रियाध (सौदी अरेबिया): 00-966-11-4884697 | टोल फ्री: 800 247 1234
तेल अवीव (इस्रायल): +972-54-7520711 / +972-54-2428378
तेहरान (इराण): +989128109115 / +989128109109
अबू धाबी (यूएई): टोल फ्री: 800-46342
कुवैत: +96565501946
बाहरीन: 00973-39418071
मस्कत: टोल फ्री: 80071234
जॉर्डन: 00962-770 422 276
बगदाद (इराक): +964 771 651 1185 / +964 770444 4899
परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय व विशेषतः महाराष्ट्रातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीनुसारच निर्णय घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


