शबनम न्यूज | प्रतिनिधी
ऑनलाईन माध्यमातून धमकी देत सायबर फसवणूक करून तब्बल ११ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी संबंधित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारित) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ ते ०६ डिसेंबर २०२४ या कालावधीत फिर्यादी पुण्यातील सोसायटीत राहत असताना अज्ञात व्यक्तींनी विविध मोबाईल क्रमांकांवरून वारंवार कॉल व व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला.
आरोपींनी स्वतःला मुंबई क्राईम ब्रँचमधील अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी व त्यांच्या वडिलांना धमकावले. आधारकार्ड, बँक खाते, एटीएम कार्ड बनावट केल्याचा आरोप करत तात्काळ कारवाई व अटकेची भीती दाखवण्यात आली.
तसेच सुप्रीम कोर्टाच्या फंडासाठी रक्कम जमा केल्यास अटक टाळता येईल, असे सांगून आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडले. या धमकी आणि मानसिक दबावामुळे फिर्यादीच्या वडिलांकडून एकूण ११ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आले.
नंतर हा प्रकार फसवणूक असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी संबंधित मोबाईल क्रमांक, बँक खाती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून सायबर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी अशा धमकीच्या कॉल्सना बळी न पडता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


