spot_img
spot_img
spot_img

आदर्श शिक्षण संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आदर्श शिक्षण संस्थेच्या बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संस्थेच्या संचालक प्रियांका बारसे यांच्या वतीने आयोजित मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रवीण आण्णा बारसे यांनी स्वीकारले होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विषयतज्ञ विक्रम मोरे सर तसेच पत्रकार शबनम सय्यद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्राथमिक, माध्यमिक आणि बालवाडी विभागातील पालक प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थित राहत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.

कार्यक्रमास प्रारंभ होण्यापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहिली. वातावरण काही क्षण गंभीर झाले असले तरी त्यानंतर कार्यक्रम उत्साहात सुरू झाला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विषयतज्ञ विक्रम मोरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रियांका बारसे तसेच पत्रकार गजाला सय्यद यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे कौतुक केले. प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेणाऱ्या सर्वांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले व सहकार्याबद्दल आभार मानले.

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध रंगी कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. सामाजिक, शैक्षणिक, भावनिक, पर्यावरण, ऐतिहासिक तसेच देशभक्तीपर विषयांवर आधारित नृत्य, नाटिका, गीत व सादरीकरणे पाहून प्रेक्षक भारावून गेले. प्रत्येक कार्यक्रम इतका उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध होता की तो एखाद्या व्यावसायिक कोरिओग्राफरलाही लाजवेल असा होता. सुमारे चार तासांचा कार्यक्रम कसा संपला, हे कोणालाही कळले नाही.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तांबोळी सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनीच केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढवण्याचा स्तुत्य प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

स्नेहसंमेलन प्रसंगी श्रीराम विद्यालयाचे जगदाळे सर, यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या निकम मॅडम, ज्ञानसागर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आंद्रे मॅडम, समता विद्यालयाच्या होले मॅडम, श्रमजीवी विद्यालयाचे राक्षे सर तसेच आगरवाल विद्यालयाचे गारगोटे सर व देशमुख सर यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली.

या संपूर्ण स्नेहसंमेलनाच्या आठवणी जतन करण्याचे काम मयुरेश फोटो स्टुडिओचे संचालक मुरलीधर केंद्रे व त्यांच्या टीमने फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून केले. तसेच शाळेतील सहशिक्षक गंगाधर भदाडे व राधा बने यांनी अंकुशराव सभागृहाच्या प्रांगणात आकर्षक रांगोळी काढून वातावरण अधिक रंगतदार केले. पाटील सरांनी कार्यक्रम पत्रिकेच्या माध्यमातून आपली कलाकृती सादर केली.

बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सुषमा कुंभार, प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका चित्रा औटी आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लढे मॅडम यांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक गायकवाड सर यांनी उपस्थित मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
उत्साह, शिस्त, संस्कार आणि कलागुणांचा संगम असलेले हे स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!