शबनम न्यूज | प्रतिनिधी
महात्मा गांधीजींवर सहा वेळा आत्मघातकी हल्ला करण्यात आला तरीदेखील त्यांनी कधीही सुरक्षा व्यवस्था घेतली नाही. मजबुरी नव्हे मजबुती का नाम महात्मा गांधी आहे. गांधीजींनी देशाला मजबूत आणि समजुतदार असे दुरदृष्टीचे नेतृत्व दिले. मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणणारांनी आधी गांधीजींच्या जीवनकार्याचा अभ्यास करावा. अपप्रचाराला बळी पडू नये. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक व ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत झटाले यांनी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांचे वतीने रविवारी गांधी भवन, कोथरूड, येथे २८ वे गांधी दर्शन शिबिर संपन्न झाले. यामध्ये सुप्रसिद्ध लेखक व ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत झटाले यांनी ‘मजबुती का नाम गांधी ‘ तर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक, अध्यक्ष, प्रा. डॉ. सुधाकर जाधवर यांनी ‘आजचा युवक दशा आणि दिशा’, आणि चरखा अभ्यासक माधवराव सहस्त्रबुद्धे यांनी ‘स्वातंत्र्य लढ्यातील चरख्याचे महत्त्व’ या विषयावर विचार मांडले. यावेळी लक्ष्मीकांत देशमुख, प्रविण सप्तर्षी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी सत्याग्रही विचारधारा मासिकाच्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रा. चंद्रकांत झटाले म्हणाले की, महात्मा गांधीजींच्यावर एक लाख आठ हजार पुस्तके प्रसिध्द झाली आहेत. ८२ देशात त्यांचे पुतळे असून ६०० विद्यापीठात गांधी विचार शिकवले जातात. गांधी विचारांच्या मजबुतीचा हा पुरावा आहे. स्टेडियमला असलेले सरदार वल्लभ भाई पटेलांचे नाव बदलून तेथे पंतप्रधान मोदीजींचे नाव दिले. सरदार पेटलांचा हा अपमान कोणी केला?
गांधीजींच्या धाडसी स्वभावाचे उदाहरण देताना प्रा. झटाले म्हणाले की, चंपारण्य सत्याग्रहासाठी महात्मा गांधी आले होते. एकजण सर्वांना म्हणायचा, गांधी भोवती सारखे लोक असतात, एकटा भेटला तर मी त्याला मारून टाकेन. महात्मा गांधींना हे समजल्यावर भल्या पहाटे गांधी त्या इसमाच्या घरी गेले. दरवाजा वाजवला. त्या माणसाने दरवाजा उघडला तर समोर गांधीजी उभे होते. गांधीजी त्याला म्हणाले की, मी एकटा तुझ्या घरी आलो आहे. मला मारून तुझी इच्छा पूर्ण कर. त्या माणसाने गांधीजींची माफी मागितली.
माधवराव सहस्रबुद्धे म्हणाले की, ब्रिटिशांनी भारतातील वस्त्रोद्योग मोडकळीस आणला. त्यामुळे शेती वरचा बोजा वाढला, बेरोजगारी वाढली अशा काळात गांधीजी भारतात आले. गांधीजींनी चरख्याला स्वातंत्र्य लढ्यामध्ये केंद्रस्थानी आणलं. आता पतंगाचा दोरा, गणपती मूर्ती चीन मधून येत आहे. त्यामुळे नव्याने स्वदेशीची चळवळ सुरु करण्याची गरज आहे. मोठी बेरोजगारी आहे. गांधीजींच्या तुल्यबळ नेता कोणी नाही. आपल्या परिने आपण काय करू शकतो ते करायला हवे. गांधी विचार आपल्याला पटले असतील तर त्याची अंमलबजावणी आपल्या जीवनात करायला हवी. वैयक्तिक पातळीवर मी स्वतःला घडविण्याचा प्रयत्न करतो.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक, अध्यक्ष, प्रा. डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले की, महापुरूषांच्या जीवनापासून युवकांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. देशाच्या विकासात युवक मोठे योगदान देवू शकतात. आपल्या भारतीय परंपरेत असलेल्या चांगल्या बाबींचा शिक्षणक्रमात समावेश असावा. नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद नाही. पुरेशी तरतूद नसेल तर ते राबविणे शिक्षण संस्थांना शक्य होणार नाही.
अन्वर राजन म्हणाले की, महात्मा गांधीजींवर खोटे नाटे आरोप करून त्यांचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. त्याला सत्याच्या आधाराने उत्तर देण्याचे काम करताना, गांधीजींचे विचार पारदर्शकपणे लोकांच्या पर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
सुत्रसंचलन सुरज कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक अन्वर राजन यांनी केले. सचिन चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
गांधी दर्शन शिबीरात व्यक्त झालेले मुद्दे
राजकीय नेत्यांनी चरखा या शब्दाची वेगळीच फोड आपल्या जीवनात केली आहे. त्यांना फक्त चर आणि खा एवढेच कळते.
*गांधी विचारांची देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आज गरज आहे.
*भगतसिंह यांची फाशी टळावी म्हणून गांधीजींना सहा वेळा प्रयत्न केला. ब्रिटीश सरकारला पत्रे पाठवली. भगतसिंह यांची फाशी थांबावी म्हणून संघ, सावरकर आदींनी काय केले. अपप्रचार करणारांना आता प्रतिप्रश्न करा की तुमच्या नेत्यांनी काय केले.
*ईस्ट इंडिया कंपनी १७५७ साली भारतावर राज्य सुरू केले. तेव्हा १५८ वर्षात बाकीच्यांनी काय केले. २७ वर्षात गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र मिळाले.
*महात्मा गांधी यांनी सर्व सामान्यांच्या मनात धाडस निर्माण केले. महात्मा गांधीजींच्या विचारांचा मुळ गाभा सत्तेच्या विरोधात सामान्य माणसाच्या न्यायासाठी, दु:ख निर्मूलनासाठी असलेल्या संघर्षात आहे.
*लखनौ करार टिळकांनी केला. त्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण, उर्दू ला स्वतंत्र भाषेचा दर्जा देण्यात आला.
*काॉंग्रेसने बॅरिस्टर जयकरांच्या जागी बाबासाहेबांना बिनविरोध निवडून आणले.
*आताचे विचारवंत भाषणे करतात. पण कार्यक्रम देत नाही. कार्यकर्त्यांना कार्यक्रम, सक्षम पर्याय देण्यात चळवळी कमी पडल्या आहेत.
*सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी लढतो तो गांधी वादी.


