शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्य सरकारने पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली आहे. यामुळे यापुढील काळात पुणे व बीड जिल्ह्याच्या प्रशासनाची धुरा सुनेत्रा पवार सांभाळताना दिसणार आहेत.
पुणे जिल्ह्यावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष प्रेम होते. महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजितदादांनी स्वतः पुणे जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद रिक्त झाले होते. अखेर राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेत सुनेत्रा पवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली होती. बारामतीजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांच्यासह चार जणांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली.
मात्र अजितदादांवरील अंत्यसंस्कारानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडींना सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता पुणे आणि बीडसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांची पालकमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


