शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (शनिवार) महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे पार पडलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यासह सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने वेगाने निर्णय घेत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड केली होती. विधिमंडळ गटनेतेपदी त्यांच्या निवडीवेळी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी प्रस्ताव मांडला, तर छगन भुजबळ यांनी त्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. उपस्थित सर्व आमदारांनी एकमताने या निवडीला पाठिंबा दिला.
राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून, एकीकडे अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत, तर दुसरीकडे महिला नेतृत्वाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील वाटचाल कशी असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


