spot_img
spot_img
spot_img

समाजात रुंदावणारी विषमतेची दरी चिंताजनक – ॲड. प्रार्थना सदावर्ते यांचे प्रतिपादन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

“सध्या सर्व पातळ्यांवर समाजात रुंदावत जाणारी विषमतेची दरी, हा चिंतेचा विषय आहे. समानतेचे मूल्य सांगणाऱ्या संविधानासमोरील विषमता हे आव्हान आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रार्थना सदावर्ते यांनी केले. समानता प्रस्थापित करण्यासाठी झटणाऱ्या चळवळींना बळ दिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

विश्वबंधुता साहित्य परिषद, पुणे, काषाय प्रकाशन आणि बंधुता प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी क्रांतीसूर्य सावित्रीज्योती या पुस्तकाचे प्रकाशन, संविधान गीताचे देशार्पण, वंदे संविधान कविसंमेलन तसेच संविधान गीतकार प्रा. शंकर आथरे यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.

स्वागताध्यक्ष डाॅ. अशोककुमार पगारिया, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे डाॅ. शमसुद्दीन तांबोळी, काषाय प्रकाशनाचे प्रा. चंद्रकांत वानखेडे, बंधुता प्रतिष्ठानच्या संचालिका मंदाकिनी रोकडे, बंधुताचार्य प्रकाश रोकडे तसेच संयोजन समितीतील सुलभा मुंगी, सीमा गांधी, प्रा. सायली गोसावी व निमंत्रक डाॅ. बंडोपंत कांबळे, डाॅ. सविता पाटील, प्रा. भारती जाधव, प्रा. प्रशांत रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. नवी पेठ येथील पत्रकार भवनच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

ॲड. सदावर्ते यांनी संविधानगीताची रचना आणि रचनाकार प्रा. शंकर आथरे यांचे विशेष कौतुक केले. संविधानगीत हा अभिमानाचा ठेवा असून, तो आज देशाला अर्पण करण्यात आला आहे. या गीतात संविधानाचे सार उतरले आहे. या गीताचा सर्वत्र प्रसार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, त्याच संविधानापुढे आज उभी असलेली आव्हाने आपण विसरता कामा नयेत. धर्मनिरपेक्षता, समानता, बंधुता या घटनेने सांगितलेल्या मूल्यांचा आज र्‍हास होताना दिसत आहे. सर्व प्रकारच्या यंत्रणा, न्यायव्यवस्था, तपास व्यवस्था कमकुवत होत आहेत. राजकीय अस्थिरता दिसत आहे आणि समाजाच्या सर्व पातळ्यांवर विषमता दिवसेंदिवस वाढते आहे, याची चिंता त्यांनी व्यक्त केली. विषमता कमी करण्यासाठी संविधानात नव्या तरतुदी करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे त्या म्हणाल्या.

प्रा. शमसुद्दीन तांबोळी म्हणाले, सध्या सगळीकडे बंधुतेचे तत्त्व पुसून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समाजघटकांत परस्परांविषयी द्वेषभाव निर्माण कऱणे, हाच अजेंडा दिसत आहे. हेटस्पीचचे प्रमाण लक्षणीय असून, त्याविरोधात बंधुतेची मशाल उभारणार्यांना बळ दिले पाहिजे. दिवसेंदिवस संविधानासमोरची आव्हाने वाढत आहेत. आजचे सत्ताधारी संविधानाला गोधडी म्हणतात. त्यांना संविधानाने सांगितलेली धर्मनिरपेक्षता संपवायची आहे. त्याविरोधात आपण समता, बंधुतेसाठी काम करायचे आहे. मुस्लिम समाज संविधानवादी व्हावा, यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळ कार्यरत आहे. धर्मनिरपेक्ष, एकात्म अशी समाजनिर्मिती आपल्याला अभिप्रेत आहे. मात्र, मूठभर जमातवादी आणि जहाल मंडळींमुळे संपूर्ण मुस्लिम समाज टार्गेट केला जात आहे. अशा परिस्थितीत आपण बंधुता आणि समतेवर विश्वास ठेवणार्यांनी मानवतावादी दृष्टीने कार्य केले पाहिजे.

बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी समता आणि बंधुतेच्या माध्यमातून आपला देश हे विश्वबंधुतेचे तीर्थक्षेत्र व्हावे, असा आशावाद व्यक्त केला. सध्याच्या सत्ताधार्यांना फक्त सत्तेची, धनाची, त्यांच्या प्रतिष्ठेची चिंता आहे. त्यांना आपल्या संविधानाची, देशाच्या अखंडतेची, धर्मनिरपेक्षतेची, सामाजिक समतेची, शेतकरी – श्रमिकांची अजिबात पर्वा नाही. पण आपण त्याविरोधात सातत्याने संघर्ष करत लढा सुरू ठेवला पाहिजे, असे ते म्हणाले.

संविधान गीताचे रचनाकार प्रा. शंकर आथरे यांनी संविधान गीताचे गायन केले. या गीताची संकल्पना आणि श्रेय बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांचे आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात वंदे संविधान काव्यसंमेलनाचे सादरीकरण झाले.

स्वागताध्यक्ष पगारिया म्हणाले, आजचे सामाजिक चित्र विदारक आहे. सामाजिक न्याय, बंधुता, समानता यांची स्थिती चिंतनीय आहे. बंधुतेची चळवळ घराघरात आणि मनामनात पोचवावी, हाच उद्देश आहे.

संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात आचार्य आनंदऋषीजी इंग्लिश मिडियम स्कूल कासारवाडीमधील विद्यार्थ्यांचीही उपस्थिती होती.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!