spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड: प्रभाग क्रमांक १८ मध्ये अफवांचे राजकारण; भाजपकडून खंडन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून, त्याचबरोबर चर्चा व अफवांनाही उधाण आले आहे. अशाच एका अफवेने सध्या सोशल मीडियावर जोर धरला असून, प्रभाग क्रमांक १८ मध्ये अपक्ष उमेदवार राजेंद्र गावडे यांना जगताप कुटुंबीयांची साथ मिळणार असल्याचे संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

या व्हायरल संदेशांमध्ये राजेंद्र गावडे व जगताप कुटुंबीयांचे संबंध घनिष्ठ असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती पाहता हा दावा पूर्णतः अफवाधारित असून, निवडणुकीला वेगळा रंग देण्यासाठी जाणीवपूर्वक पसरवण्यात येत असल्याचे आता समोर आले आहे. जगताप कुटुंब हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कुटुंब असून, पक्षाशी त्यांची दीर्घकाळाची एकनिष्ठ भूमिका राहिली आहे.

या प्रकारच्या अफवा म्हणजे जगताप कुटुंबीयांची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राजेंद्र गावडे यांना भाजपकडून प्रभाग क्रमांक १८ साठी उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून सुरेश भोईर हे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

अशा परिस्थितीत राजेंद्र गावडे आणि जगताप कुटुंबीयांमध्ये जवळीक असल्याचे संदेश व्हायरल झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही ठिकाणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा राजेंद्र गावडे यांच्या उमेदवाराला असल्याच्या अफवाही पसरवण्यात आल्या. मात्र, ही बाब देखील पूर्णतः निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संदर्भात भाजप आमदार शंकर जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, पक्षातील सूत्रांनुसार हा प्रकार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना व पक्षाच्या प्रतिमेला बदनाम करण्याच्या उद्देशाने करण्यात येत असल्याचे समजते.

दरम्यान, भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश भोईर यांनी या अफवांवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ही केवळ अफवा आहे. जगताप कुटुंब आणि पक्षाचे वरिष्ठ नेते हे नेहमीच भारतीय जनता पक्षासोबत एकनिष्ठ राहिले आहेत. त्यांच्या पक्षनिष्ठेचा मोठा इतिहास आहे. जर राजेंद्र गावडे आणि जगताप कुटुंबीयांचे संबंध तसे असते, तर मला उमेदवारी न मिळता गावडे कुटुंबीयांनाच पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली असती.”

तसेच त्यांनी प्रभाग क्रमांक १८ मधील मतदारांना आवाहन करत सांगितले की, “मतदारांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सत्य परिस्थिती ओळखून निर्णय घ्यावा.”
एकूणच, प्रभाग क्रमांक १८ मध्ये निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे अफवांचे राजकारण रंगात येत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, भाजपकडून या सर्व अफवांचे स्पष्ट खंडन करण्यात आले असून, मतदारांनी सजग राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!